शहरातील अरगन तलावामध्ये आत्महत्या करणाऱ्या सह्याद्रीनगर येथील क्रिशा केशवानी आणि तिचा मुलगा भावीर यांचे मृतदेह काल सापडले असले तरी दुसरा मुलगा वीरेन याचा मृतदेह शोधण्याचे प्रयत्न कालपासून केले जात होते. या प्रयत्नांना आज शनिवारी दुपारी सुमारे 24 तासानंतर यश आले असून तलावात सापडलेला विरेनाचा मृतदेह शवचिकित्सेसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडण्यात आला आहे
हिंडलगा गणपती मंदिरानजीकच्या आरगन तलावांमध्ये काल दुपारी क्रिशा केशवानी व भावीर केशवानी माय लेकाचा मृतदेह आढळून आला होता. या दोघांसोबत क्रिशाचा आणखीन एक मुलगा वीरेन तलावात बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्याला शोधण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान आणि पाणबुड्यांनी काल रात्री उशिरापर्यंत तलावात शोध मोहीम जारी ठेवली होती.
त्यानंतर आज शनिवार सकाळपासून पुन्हा आरगन तलावामध्ये उतरून शोध पथकाने मृतदेह शोधण्याचे काम सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रयत्नांना दुपारी यश आले आणि क्रिशाचा दुसरा मुलगा वीरेन याचा मृतदेह पाणबुड्यांच्या हाती लागला.
यावेळी तलावाच्या काठावर बघ्यांची गर्दी झाली होती. अरगन तलाव येथील माय लेकरांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणात मृतदेहांना सिव्हिल हॉस्पिटल तेथे नेण्यासाठी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर नीडीच्या शववाहिकेचे विशेष सहकार्य लाभले. आज देखील हेल्प फाॅर नीडीच्या शववाहिकेतून दुर्दैवी 7 वर्षीय वीरेनचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सेसाठी नेण्यात आला.
दरम्यान, क्रिशा आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे काल सकाळी दोन्ही मुलांना शाळेत सोडून येते असं सांगून क्रिशा मोपेड वरून घरातून बाहेर पडल्या होत्या. तथापी घटनास्थळ किंवा त्या परिसरात मोपेडच आढळून आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पोलिसांनी देखील मोपेडचा शोध सुरू केला आहे.