रस्त्यावरील कुत्र्यांमुळे झालेले भांडण थेट पोलीस स्थानकात पोहोचले असून याप्रकरणी एका महिलेने पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, खासबाग येथील मारुती गल्ली मधील वॉर्ड क्रमांक २१ येथे राहणाऱ्या अनिता शंकर दोडमनी या प्राणी कल्याणासाठी कार्य करतात. रस्त्यावर असणाऱ्या कुत्र्यांना नेहमी अन्न पुरविणे, त्यांची निगा राखणे हे सर्व काम त्या पाहतात.
दरम्यान त्यांच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्यांवर त्यांच्याच समोर राहणाऱ्या दाम्पत्याने गरम पाणी ओतल्याने उभयतांमध्ये वाद झाला आहे. हा वाद पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर तेथील सीपीआय देखील योग्यप्रकारे न लागल्याने हा वाद आता थेट पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचला आहे.
रस्त्यावर झोपलेल्या कुत्र्यांवर गरम पाणी ओतून विजय भस्मे आणि वनिता भस्मे या दाम्पत्याने हा वाद ओढवून घेतलाय. अनिता दोडमनी या त्या कुत्र्यांना अन्नपाणी खाऊ घालत असल्याने त्यांच्यावरच सदर दाम्पत्याने वादावादी करण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप अनिता दोडमनी यांनी केलाय. शिवाय या कुत्र्यांमुळे रस्ते अस्वच्छ होते, दारात घातलेली रांगोळी खराब होणे अशी करणे देत वादावादी केल्याचे अनिता दोडमनी यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सदर प्रकार शहापूर पोलीस स्थानकात कळविण्यात आल्यास तेथील सीपीआय विनायक बडिगेर यांनी आपल्यासोबत अवमानकारक संभाषण करत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप देखील अनिता दोडमनी यांनी केला आहे. सदर प्रकारात पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.