अलारवाड येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या चौकशीसाठी लोकायुक्त कार्यालयाचे एक पथक उद्या सोमवार दि. 14 फेब्रुवारीपासून सलग तीन दिवस बेळगावात तळ ठोकून असणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांकडून मिळाली आहे. त्याबाबतचे पत्र लोकायुक्तांकडून बेळगाव महापालिकेला पाठविण्यात आले आहे.
अलारवाड येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेल्या याचिकाकर्त्यांची लोकायुक्त पथक येत्या मंगळवारी भेट घेणार आहे. अलारवाड येथील जी जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्या जागेला लोकायुक्त पथक याचिकाकर्त्यांसमवेत भेट देऊन पाहणी करणार आहे याचिकाकर्त्यांकडील माहिती आणि त्या संदर्भातील कागदपत्रे संकलित केली जाणार आहे. आपल्या या दौऱ्याचा लोकायुक्त पथक महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडूनही माहिती संकलित करणार आहे. त्यामुळे एकंदरच लोकायुक्तांचा हा दौरा महत्त्वाचा असणार आहे.
शेतकरी नेते नारायण सावंत यांच्यासह पाच जणांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत कर्नाटक सरकार, बेळगावचे प्रांत, पाणीपुरवठा मंडळ, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. गेल्या डिसेंबर 2021 मध्ये या दाव्यात कर्नाटक लोकायुक्तनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. शिवाय या प्रकल्पाची चौकशी करण्याचा आदेश न्यायालयाने आयुक्तांना दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाला दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर लोकायुक्त पथक चौकशीसाठी बेळगावात येत आहे.
अलारवाड प्रकल्पाची जागा आणि पाणीपुरवठा मंडळाला दिलेले 2 कोटी 28 लाख रुपयांबाबतची सविस्तर माहिती महापालिकेने न्यायालयात सादर केली आहे तथापि 50 एकर जागेचे काय झाले? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. लोकायुक्तांकडून चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर न्यायालयाकडून या दाव्यावर निर्णय दिला जाणार आहे.