सावगाव -मंडोळी रस्त्याचे काम का ठप्प आहे? हे सांगताना सदर रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या संरक्षण दलाच्या जमिनीच्या मोबदल्यात आवश्यक समान किंमतीची जमीन हस्तांतरित करण्याच्या अटीची अद्याप राज्य सरकारकडून पूर्तता झालेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय संरक्षण खात्याचे राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिले आहे.
सावगाव -मंडोळी (नानावाडी ते सावगाव -मंडोळी अंगडी इंजिनीरिंग कॉलेज मार्गे) रस्त्याच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली संरक्षण दलाची 2.718 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने बदल्यात समान किंमतीची जमीन देण्याच्या अटीवर मंजूर केला होता.
त्यामुळे सदर रस्त्याचे काम हाती घ्यायचे असल्यास सरकारने सर्वप्रथम संरक्षण दलाकडे पर्यायी जागा हस्तांतरित करणे गरजेचे आहे. मात्र सदर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी दिले आहे.
बेळगाव -सावगाव रस्ता संरक्षण दलाच्या जागेतून जात असल्यामुळे संरक्षण दलाचे अधिकारी या रस्त्याच्या बांधकामास आक्षेप घेत आहेत,
असा मुद्दा बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना संरक्षण खात्याचे राज्यमंत्री अजय भट्ट यांनी उपरोक्त स्पष्टीकरण दिले.