बेळगाव वनखात्याच्या कार्यालय आवारातील एका खोलीच्या कुलपाची कडी कापून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे चंदनाचे ओंडके चोरण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी उघडकीस आली.
मध्यवर्ती बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर मार्केट पोलीस स्थानकात शेजारी वनखात्याचे कार्यालय आहे. येथील डीआरएफओ कार्यालया शेजारील खोलीमध्ये तीन जिल्ह्यात जप्त करण्यात आलेले चंदन ठेवून त्याला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. सदर खोलीला लावलेले कुलूप तसेच असले तरी आतील चंदनाचे सहा ओंडके चोरीला गेल्याचे काल शनिवारी उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पोलिसांच्या पाहणीत खोलीला लावलेली कडी तशीच असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र बारकाईने पाहिले असता कडी कापून चोरट्यांनी खोलीत प्रवेश केल्याचे उघडकीस आले. हा एकंदर प्रकार पाहता वारंवार खोलीत प्रवेश करता यावा यासाठी शिताफीने कडी कापण्यात आली आहे.
कारण त्यावर कुलूप लावले की कापलेला भाग दिसतही नाही. मात्र सहजपणे कुलूप काढून खोलीत प्रवेश करता येतो. सदर प्रकार वेळीच लक्षात आला नसल्यामुळे माहितीगार व्यक्तीकडून वारंवार चंदनाची लाकडे पळविण्यात आली असावीत असा कयास आहे.
पोलिस सूत्रांनुसार सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या चंदनाच्या लाकडांची चोरी झाली असून याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.