वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सीमावर्तीय चेकपोस्टच्या ठिकाणची तपासणी अधिक कडक केली आहे. तथापि ही तपासणी चुकून आडमार्गाने कर्नाटकात प्रवेश करण्याचे वाहनचालकांचे प्रयत्न सुरूच आहेत. अशी अगळीक करणाऱ्या 2 खाजगी बस गाड्यांविरुद्ध पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
निपाणी येथील राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्टच्या ठिकाणी सध्या कोरोना संदर्भातील तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. या ठिकाणी आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असलेल्यांनाच जिल्ह्यातसह राज्यात प्रवेश दिला जात आहे. कर्नाटक हद्दीत प्रवेश करणाऱ्या खाजगी वाहनातील सर्व प्रवाशांकडे आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र असणे सक्तीचे करण्यात आले आहे.
तथापि चेक पोस्टवरील तपासणी चुकून आडमार्गाने कर्नाटकात प्रवेश करण्याचे वाहनचालकांचे प्रयत्न सुरूच आहेत. याच पद्धतीने राज्यात बेकायदेशीर प्रवेश करण्याचा 2 खाजगी बसगाड्यांचा प्रयत्न पोलिसांनी नुकताच हाणून पाडला. या दोन्ही बस गाड्यांचे मालक, चालक, वाहक आणि प्रवाशांविरुद्ध निपाणी पोलीस ठाण्यात कर्नाटक संसर्गजन्य रोग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अडवून तपासणी केलेल्या शर्मा ट्रान्सपोर्ट बसमधील 28 प्रवाशांपैकी 24 जणांकडे आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे. सदर बस मुंबईहून बेंगलोरकडे निघाली होती. त्याचप्रमाणे नॅशनल ट्रॅव्हल्स या अन्य एका बसमधील 28 प्रवाशांपैकी 17 प्रवाशांकडे आरटी -पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नव्हते.
ही बस देखील मुंबईहून बेंगलोरकडे निघाली होती. निपाणी नजीक राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी चेकपोस्ट चुकवून कागल, शेंदुर, आप्पाचीवाडी मार्गे परस्पर राष्ट्रीय महामार्गावर गाठण्याचा या बसगाड्यांचा प्रयत्न होता, असे पोलिसांनी सांगितले.