उपनोंदणी कार्यालय कामकाजाची वेळ अडीच तासांनी वाढविण्यात आली असून उपनोंदणी आणि मुद्रांक विभागाने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश गेल्या 15 फेब्रुवारी रोजी जारी झाल्यामुळे या स्वरूपाचा निर्णय घेणारा हा राज्यातील पहिला विभाग ठरला आहे.
सरकारी काम बारा महिने थांब, अशी म्हण आहे. परंतु यात पहिल्यांदाच सुधारणा केली जात आहे. सर्व शासकीय कार्यालयांचे कामकाज सकाळी 10 ते सायंकाळी 5:30 यावेळेत चालते. परंतु या कालावधीत अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी किती उपलब्ध होतात? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे यासंदर्भात पहिल्यांदा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामाची वेळ अडीच तासांनी वाढविण्यात आली आहे. त्यानुसार नोंदणी कार्यालय आता सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि सायंकाळी 7 वाजेपर्यंत जनतेसाठी खुले राहील. यामुळे जनतेची गैरसोय टळणार आहे.
या स्वरूपाचा शासकीय पातळीवर पहिल्यांदाच निर्णय घेतला गेला आहे. जनतेच्या हितासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आदेशाची तातडीने कार्यवाही केली जावी असा उल्लेख आदेशात आहे. उपनोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या आयुक्तांनी हा आदेश बजावला असून राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालयाने याची तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
उपनोंदणी कार्यालयात मालमत्ता खरेदी-विक्री मालमत्ता कागदपत्रातील दुरुस्तीवर कार्यवाही केली जाते यासाठी या कार्यालयात नियमित गर्दी असते परिणामी सदर विभागावर कामाचे अतिरिक्त ओझे जाणवते यासाठी वेळेची मर्यादा वाढवून जनतेची सोय करून देण्यात आली आहे याशिवाय वेळ वाढल्यामुळे कामाचा निपटारा अधिक वेगाने करणे शक्य होणार आहे.