कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा बुडालेला अभ्यास भरून काढण्यासाठी शिक्षण खात्याने शाळांच्या वार्षिक सुट्ट्यांमध्ये 15 दिवसाची कपात केली आहे. आता आगामी 2022 -23 सालचे शैक्षणिक वर्ष नेहमीच्या 1 जून ऐवजी 16 मे 2022 पासून सुरू होणार आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष येत्या 9 एप्रिल रोजी समाप्त होणार असल्यामुळे शिक्षण खात्याने पुढील शैक्षणिक वर्षाचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये उन्हाळ्याची वार्षिक सुट्टी 10 एप्रिल ते 15 मे 2022 या कालावधीमध्ये निश्चित केली आहे.
शिक्षण खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावामुळे वर्गातील प्रत्यक्ष शिक्षण फार कमी झाले आणि ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत तक्रारी आहेत.
वर्गात बसून प्रत्यक्ष शिक्षण न घेतल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली आहे. यातून पूर्वपदावर येण्यासाठी नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये उत्साहवर्धक अभ्यास कार्यक्रम हाती घेण्याचा सरकारचा विचार आहे.
दरम्यान राज्यातील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या वर्गांची अंतिम वार्षिक परीक्षा येत्या 24 मार्चपासून सुरू होणार आहे.