पूर्णपणे रिलॅक्स म्हणजे विश्रांतीच्या मूडमध्ये असलेल्या माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी सध्या शेजारील गोवा राज्यातील निवडणूक प्रचाराला वाहून घेतले आहे.
बेळगावचे भाजप नेते किरण जाधव आणि अशोक असोदे हे उभयता माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या समवेत सध्या गोव्यामध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचार कार्यात व्यस्त आहेत. गोव्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. रमेश जारकीहोळी आणि फडणवीस यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळे जारकीहोळी गोवा निवडणुकीच्या प्रचार रिंगणात उतरले आहेत.
गोव्यातील पोर्वोरिम विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार रोहन अशोक खावटे यांच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सांभाळली आहे. त्यांनी आज शुक्रवारी मतदारसंघाचा दौरा करून घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.
तसेच मतदारांना गोकाकची सुप्रसिद्ध मिठाई करदंट भेट देऊन भाजप उमेदवार खावटे यांनाच बहुमताने विजयी करण्याची विनंती केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत किरण जाधव व अशोक असोदे यांच्यासह स्थानिक भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.