हिजाब परिधान करणे ही इस्लाम धर्माचा एक रितीरिवाज आहे. भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना आपल्या धर्माचे रितीरिवाज पाळण्याचे अधिकार दिलेले आहेत. तेंव्हा पदवीपूर्व शिक्षण संस्था तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलींनी हिजाब परिधान करण्यावर बंदी आणली जाऊ नये, या मागणीसाठी ऑल इंडिया मजलिस ई इतिहादुल मुस्लिमीन संघटनेतर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
पदवीपूर्व महाविद्यालय आणि विद्यापीठातील ‘हिजाब’ बंदीच्या विरोधात ऑल इंडिया मजलिस ई इतिहादुल मुस्लिमीन संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी सकाळी जोरदार आवाज उठविताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे कर्नाटक राज्य सरचिटणीस माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. अलीकडे राज्यातील बऱ्याच पदवीपूर्व तसेच उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींनी हिजाब तोंडावरील बुरखा परिधान करू नये असा नियम लागू करण्यात आला आहे.
या नियमांचे पालन न केल्यास वर्गामध्ये अथवा परीक्षेला बसू दिले जाणार नाही असे धमकावले जात आहे. त्यामुळे मुस्लिम मुलींच्या मानसिकतेवर परिणाम होण्याबरोबरच त्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्यात आली आहे. मुस्लिम मुलींच्या शिक्षण घेण्याच्या अधिकारामध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे सदर नियम लागू करून शांतता आणि कायदा व सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकता आणि विविधता या देशाच्या प्रतिमेला बाधा पोहोचत असून या प्रकारामुळे चुकीचा संदेश जाऊन जगभरात देशाची वाईट प्रतिमा निर्माण होत आहे.
एकंदर प्रकार पाहता राज्यात भारतीय घटनेने दिलेल्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण केले जावेत. घटनेनुसार मानवाधिकाराचे रक्षण केले जावे. महिलांच्या अधिकारांचे संरक्षण करावे भाषिक आणि जातीय अल्पसंख्यांक अधिकारांचे संरक्षण केले जावे शिक्षणाच्या अधिकाराचे संरक्षण केले जावे. राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शांती आणि सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे. भारतीय घटनेतील हे सर्व अधिकार नाकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ऑल इंडिया मजलिस ई इतिहादुल मुस्लिमीन संघटनेचे राज्य सरचिटणीस लतीफ खान पठाण म्हणाले की, हिजाब हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. कुणी काय परिधान करावे. कोणता आहार घ्यावा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून सर्वांना दिलेला अधिकार आहे. हा अधिकार कर्नाटकातील भाजप सरकार आमच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू. आज बेळगावात आंदोलन निदर्शने झाली यापुढे राज्यभरात ती होतील. उत्तर कर्नाटकातील मराठी, उर्दू, कन्नड आदी सर्व सर्व शाळांमध्ये आजच्या घडीला शौचालय नाहीत, शिक्षक नाहीत, शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थित दिले जात नाही या पद्धतीने शैक्षणिक क्षेत्रात अपयशी ठरत असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी आता हिजाबवर निर्बंध लादून मुलामुलींची दिशाभूल केली जात आहे. मुस्लिम मुली अशिक्षित रहाव्यात यासाठी हा प्रयत्न केला जात आहे असा आरोप पठाण यांनी केला. त्याचप्रमाणे राज्य सरकारने शिक्षणामध्ये राजकारण करू नये सर्वांना सौहार्दपूर्ण वातावरणात शिक्षण घेण्याची संधी दिली जावी अशी मागणीही त्यांनी केली.
ऑल इंडिया मजलिस ई इतिहादुल मुस्लिमीन संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या आंदोलनात शहरातील विविध शैक्षणिक संस्थांच्या बहुसंख्य विद्यार्थिनी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिजाब हमारा हक है, लेके रहेंगे लेके रहेंगे आजादी लेके रहेंगे, हम छीन लेंगे आजादी, वी वॉन्ट जस्टीस… आदी घोषणांनी उपस्थित विद्यार्थिनींनी जिल्हाधिकारी आवार दणाणून सोडले होते.