स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे कारण पुढे करून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 मध्ये दिवसेंदिवस अस्वच्छतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहराच्या प्रभाग क्र. 10 मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आकाराने मोठ्या असलेल्या या प्रभागात जवळपास 11 गल्ल्या आणि 9 बोळ असून या ठिकाणी जवळपास 20-25 स्वच्छता कामगारांची गरज असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात सध्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे प्रभागात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. गटारी, रस्ते आणि रस्त्याशेजारील केरकचरा यांची वेळच्यावेळी साफसफाई होत नसल्याने नागरिकात नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रभागात वैशाली सिद्धार्थ भातकांडे या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. निवडून येताच त्या आणि त्यांचे पती सिद्धार्थ भातकांडे हे उभयता प्रभागातील नागरी समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. प्रभागांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत हेळसांड होत असल्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून ज्यादा स्वच्छता कर्मचारी मिळावेत यासाठी नगरसेविका वैशाली भातकांडे आपल्या पतीसमवेत पाठपुरावा करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी आरोग्य अधिकार्यांपासून मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वांना अर्ज -विनंत्या केल्या आहेत. मात्र अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक शिवानंद भोसले यांच्याकडे विचारणा केली असता कामगार टंचाईचे कारण पुढे करून ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे सांगितले जाते. एकंदर महापालिकेचे प्रभाग क्र. 10 मधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे.
मात्र याचे परिणाम मात्र नगरसेवकांना सहन करावे लागत असून त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तरी मनपा आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या प्रभागात तात्काळ आवश्यक अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी केली जाते आहे.