Monday, December 30, 2024

/

जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला आंदोलनांची धास्ती!

 belgaum

बेळगाव लाईव्ह, विशेष : बेळगावमधील सर्वाधिक वाहनांची रहदारी अनेक मार्गावर असेल असे आपण गृहीत धरून जाऊ शकतो. मात्र बेळगावमधील सर्वाधिक नागरिकांची वर्दळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नक्कीच दिसून येते. बेळगाव मध्ये घडलेल्या घटना असोत किंवा बेंगळूर… दिल्ली.. इतकेच नाही तर राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या घटनांचा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेहमीच दिसून येतो.

गेल्या काही कालावधीत कोविडमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कार्यालय परिसराने मोकळा श्वास घेतला होता. सध्या कोविड परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदने, आंदोलने याचा अक्षरशः पाऊस पडत आहे. शिवमूर्ती विटंबना, महामेळावा, अधिवेशन या प्रकरणांपासून ते हिजाब, मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांचा विरोध, शिवमोगा येथे झालेले खून प्रकरण.. अगदी पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक दरवाढ ते नागरी समस्या अशा अनेक कारणास्तव आंदोलक याठिकाणी गर्दी करतात. सरकारी कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि बेळगाव जिल्ह्यातील अनेक घटनांवर आधारित निवेदने घेऊन अनेक आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अक्षरशः ठाण मांडलेले दिसून येतात.

गेले काही दिवस राज्यातील राजकारणात उलट सुलट घटना घडत असून याचा परिणाम मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिसून येत आहे. सध्या गाजत असलेले हिजाब प्रकरण हे ही यापैकीच एक! हिजाब समर्थन आणि हिजाबचा विरोध करणारे आंदोलक हातात फलक आणि निवेदने घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर असतात. या साऱ्या प्रकारांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसराचे वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनत चालले आहे. याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने दक्षता घेऊन चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. एरव्ही तुरळक प्रमाणात हजर असणारे पोलीस सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवत आहेत. शहरातील राजकीय आणि इतर वातावरणाचा परिणाम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाणवत असून या कारणास्तव या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Police infront dc office

एकंदर ही सारी परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने आणि निवेदनाचा पाऊस पडत आहे. एका मागोमाग एक अशा अनेक संघटना, संस्था, नागरिक आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदने सादर करताना दिसून येत आहेत. नागरिकांसह याठिकाणी पत्रकारांचीही गर्दी निदर्शनास येते. मात्र इतकी सारी निवेदने इतक्या साऱ्या मागण्या शासन दरबारी पोहोचत असतील का? आणि पोहोचल्या तर त्यांना कितपत प्रतिसाद मिळतो हा सर्वसामान्य नागरिकांना पडणारा अनुत्तरित प्रश्न आहे.

केवळ घटना घडल्यानंतर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी सादर करण्यात येणारी निवेदने, आयोजित करण्यात येणारे मोर्चे, आंदोलने याने काहीच सिद्ध होणार नाही. प्रशासन आपल्या कामात व्यस्त आहे.. आणि नागरिक हातात बॅनरबाजी करत आंदोलने, मोर्चे काढत आहे… हा सारा प्रकार एका ठराविक मुक्कामावर थांबणे आवश्यक आहे. प्रशासनासह प्रत्येक नागरिकानेही आपले कर्तव्य, हक्क याची योग्य अम्मलबजावणी करणे आवश्यक आहे. सध्या बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय निवेदनाच्या महापुराखाली अडकले असून मोकळा श्वास घेण्यासाठी पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.