ग्रामीण भागातील लोकांचा जन्म व मृत्यूचा दाखला यापुढे ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) मंजूर करणार आहेत. राज्य शासनाने तसा आदेश जारी केले आहे.
यापूर्वी जन्म आणि मृत्यूचे दाखले तलाठ्याकडून मंजूर केले जात होते. तसेच त्याची नोंद महसूल खात्याकडून ठेवली जात होती. मागील वर्षभरापासून लोकांच्या सोयीसाठी जन्म व मृत्यू दाखला मंजूर करण्याचे अधिकार पीडीओंना देण्याचा विचार शासनाने सुरू केला होता मात्र त्यावर कार्यवाही झाली नव्हती.
अखेर शासनाने आता याबाबतचा आदेश बजावला असून यापुढे पीडीओच गावातील जन्म व मृत्यूची नोंद ठेवणार आहेत. तसेच त्याचे दाखलेही त्यांच्याकडूनच मंजूर होणार आहेत.
राज्य शासनाने बजावलेल्या आदेशात ग्रामपंचायत विकास अधिकारी (पीडीओ) जन्म व मृत्यू दाखला नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत, तर तलाठी उपनोंदणी अधिकारी असतील. त्यामुळे तलाठ्यांचे अधिकारीही कमी झाले आहेत.
ग्रामपंचायत पीडीओ सध्या ‘क’ अधिकारी आहेत. त्यांचा दर्जा वाढवून त्यांना ‘ब’ दर्जा देण्याचा शासनाचा विचार असून त्यावरही कार्यवाही सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जन्म व मृत्यू दाखला नोंदणी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.