सरस्वती नगर येथील प्रताप सिंह कृष्णाजी मोहिते यांच्या प्लॉटची आणि शेडची कोणतीही पूर्वसूचना न देता नासधूस करण्यात आली आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जमीन मालकाने केला असून आपल्याला न्याय मिळवा अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सरस्वती नगर येथे रस्त्यासाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र ती जागा सोडून बेकायदेशीररीत्या प्लॉटमधून गटारी करण्याचा घाट पीडीओ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी घातला आहे.
यासंदर्भात जमीन मालकाने अनेकवेळा नोटीस दिली आहे. परंतु या नोटीसीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने सदर बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसीलदार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि शहानिशा करतील अशी ग्वाही देण्यात आली असून सदर प्लॉट ग्रामपंचायतीने ताब्यात देखील घेतला आहे. ग्रामपंचायतीने या जागेवर बुलडोजर फिरवला असून मोहिते कुटुंबीय रस्त्यावर आले आहेत.
केवळ मोहिते कुटुंबीयच नाही तर सरस्वती नगर येथील अनेकांचे प्लॉट बळकाविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर प्रकारात सर्वांना न्याय मिळावा, आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.