बेळगाव शहरात बापट गल्ली आणि क्लब रोड अशा दोनच ठिकाणी महापालिकेची अधिकृत कार पार्किंग स्थळे असून अन्यत्र कोठेही पार्किंग शुल्क आकारणी केली जात नसल्याचे स्पष्टीकरण बेळगाव महापालिकेने दिले आहे.
बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील सक्रिय कार पार्किंग निविदा करारासंदर्भात माहिती हक्क अधिकाराखाली अजित पाटील यांनी विचारणा केली असता महापालिकेने उपरोक्त स्पष्टीकरण दिले आहे. शहरात अनेक ठिकाणी महापालिकेच्या नावावर पार्किंग शुल्क आकारण्यात येत आहे. ही शुल्क आकारणी देखील अवाच्या सव्वा असते. यासंदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन अजित पाटील यांनी बेळगाव महापालिकेकडून माहिती मागवली. त्यानुसार शहरात बापट गल्ली आणि क्लब रोड या दोनच ठिकाणी महापालिकेकडून पार्किंग शुल्क आकारणी केली जाते. यापैकी बापट गल्ली येथील पार्किंग शुल्क आकारणीचे कंत्राट संतोष तानाजी पाटील यांना तर क्लब रोड येथील कंत्राट वनिता विवेकानंद पाटील यांना देण्यात आले आहे. सदर कंत्राटदारांना काही नियमही घालून देण्यात आले आहेत.
या नियमानुसार पार्किंग स्थळी बॅनर अथवा फलक लावून त्यावर पार्किंग शुल्क आकारणाऱ्या व्यक्तीच्या नावासह दर तासाचे पार्किंग शुल्क नमूद केलेले असावे. प्रत्येक वाहनासाठी महापालिका प्रमाणित पार्किंग शुल्क पोचपावती दिली जावी. सध्या संबंधित दोन्ही पार्किंग स्थळी चारचाकी वाहनांना दर तीन तासांसाठी 30 रुपये शुल्क आकारले जात आहे. तसेच दुचाकींना पार्किंग शुल्क आकारले जात नाही. सदर नियमांचे जर कंत्राटदाराकडून उल्लंघन होत असल्यास संबंधितांनी 741 -741 -8338 या क्रमांकावर त्यासंदर्भातील व्हिडिओ, फोटो व्हाट्सअप करावेत. तसेच नागरिकांनी याची नोंद घेऊन चुकीचे अथवा अव्वाच्या सव्वा पार्किंग शुल्क भरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.