सरकारी कर्मचारी, सरकारी कामकाजात काही त्रुटी आढळल्या तर आपण सहजतेने सरकारी कामकाजावर आणि कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढतो. मात्र एक सुजाण नागरिक म्हणून आपण कधी आपली जबाबदारी पार पाडतो का? हा प्रश्न प्रत्येकाने एक नागरिक म्हणून स्वतःला विचारणे आवश्यक आहे. आज अशाच एका बेजबाब्दारपणाच्या वागण्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.
ऑफ ड्युटी कर्मचाऱ्याच्या हजरजबाबीपणामुळे बेळगाव रेल्वेस्थानकावर एक मोठा अनर्थ होण्यापासून टळला आहे. सकाळी ११ च्या सुमारास अजमेरहून बेंगळूरला जाणाऱ्या १६२०९ या रेल्वेतून सुरतहून प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांचे जीव केवळ दैव बलवत्तर म्हणून वाचले आहेत… नव्हे वाचविले आहेत…
याबाबत अधिक माहिती अशी कि… दररोज सकाळी ११ चा सुमारास अजमेर ते बेंगळूर साठी एक रेल्वे बेळगाव रेल्वेस्थानकावरून धावते. ही रेल्वे काही ठराविक वेळेपुरती बेळगाव रेल्वेस्थानकावर थांबते. दरम्यान या रेल्वेमधून सुरतहून प्रवास करणारे एक कुटुंबीय होते. रेल्वे ज्यावेळी बेळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचली त्यावेळी सदर कुटुंबातील वडील आणि जेमतेम १२ ते १५ वयोगटातील एक मुलगी आईस्क्रीम आणण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले.
ठराविक वेळेनंतर रेल्वे निघण्याची वेळ झाली आणि रेल्वे पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी सुरु झाली. ही बाब सदर प्रवाशांच्या लक्षात आल्यानंतर दोघांनीही रेल्वेकडे धाव घेतली. परंतु रेल्वेपर्यंत पोहोचेपर्यंत रेल्वेची गती आणि प्रवाशांची गती यामध्ये तफावत झाली आणि दोन्ही प्रवाशांचा पाय रेल्वे प्लॅटफॉर्मवरून घसरला. याचदरम्यान या ऑफ ड्युटी असलेला कामावर जाण्यासाठी प्लॅट फॉर्म वर थांबलेला अनिरब गोस्वामी नावाच्या रेल्वे लोको पायलटच्या लक्षात ही बाब येताच प्रसंगावधान राखून सदर पायलट वेगाने प्रवाशांच्या दिशेने धावला. त्या दोन्ही प्रवाशांना खेचून गोस्वामी यांनी बाहेर काढले खरे पण यादरम्यान त्यांच्या गुडघ्याला दुखापत झाली.
अनिरब गोस्वामी यांनी प्रसंगावधान राखून आजचा अनर्थ टाळला खरा.. परंतु प्रत्येक वेळी अनिरब गोस्वामी यांच्यासारखे डेरिंगबाज पायलट मदतीसाठी उपस्थित असतीलच असे नाही…. केवळ दैव बलवत्तर म्हणून आजचा अनर्थ टळला आहे…
मात्र या साऱ्या प्रकारावरून प्रवाशांनी खबरदारी बाळगणे आणि जागरूक राहणे किती महत्वाचे आहे हे जाणवते. प्रत्येकवेळी सरकारी बाबींच्या त्रुटींकडे बोट दाखवण्या ऐवजी एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून पार पाडणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.