बेळगाव शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या 10 -15 दिवसापासून पाणी टंचाईची समस्या तीव्र झालेली असतानाच आता आज आणि उद्या गुरुवारी शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये व्यत्यय येणार असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
शहराच्या हिंडलगा पंपिंग हाऊस येथील दोन स्टार्टर पॅनल जळाल्यामुळे आज आणि उद्या गुरुवार दि 17 फेब्रुवारी रोजी शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यापार्श्वभूमीवर अत्यावश्यक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठ्याची सोय केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. केयुआयडीएफसीच्या व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीने सदर पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले असून नागरिकांनी पाणीपुरवठ्यातील व्यत्ययाची नोंद घेऊन एल अँड टी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरवासीयांना 25 तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखविण्यात येत असली तरी सध्या गेल्या 10 -15 दिवसांपासून शहर उपनगराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने शहरवासीयांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. शहराच्या सर्वच भागात गेल्या कांही दिवसापासून पाणी नसल्यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. काही भागात पाच दिवसांतून एकदा होणारा पाणीपुरवठा फक्त एकच तास होत आहे. हा पाणीपुरवठा अपुरा असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यास एल अँड टी कंपनी अपयशी ठरली असून शहरवासीयांना त्याचा फटका बसत आहे. पाण्यासाठी वेळ वाया जात असून टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.
यावर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. बेळगाव शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्याची 5 वर्षे कालावधीची पायाभूत सुविधा कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. पाणीपुरवठा मंडळाकडून हस्तांतरित करण्यात आलेली पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी सध्या आम्ही प्रयत्नशील आहोत. तथापि ही व्यवस्था हस्तांतरित झाल्यापासून हेस्कॉमकडून केल्या जाणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येला आम्हाला तोंड द्यावे लागत आहे. यात भर म्हणून पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी दोन वेळा केलेल्या संपामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम झाला आहे, असे एल अँड टी कंपनीने आपल्या स्पष्टीकरणात म्हंटले आहे.
शहरातील पाणी टंचाईबाबत आता सोशल मीडिया तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पूर्वी असे होत नव्हते एल अँड टी कंपनीकडे पाणीपुरवठ्याचा कारभार गेल्यानंतर पाणी मिळेनासे झाले आहे, पाणी टंचाई प्रमाणे पाण्याच्या बिलात ही कपात झाली पाहिजे. महिन्यातील 12-14 दिवस पाणी सोडणार आणि बिल मात्र महिनाभराचे घेणार हा अन्याय आहे, पाणीपट्टी जशी वेळच्यावेळी वसूल केली जाते तसे आधी पाणी देखील वेळच्यावेळी सोडा म्हणून सांगा, हा सरकारी क्षेत्राच्या खाजगीकरणाचा परिणाम आहे. कोणीही या खाजगी कंपन्यांना जाब विचारू शकत नाही. यासारख्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत