एकीकडे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणाखाली येत असताना महाराष्ट्रातील कांही जिल्ह्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’ रोगाने डोके वर काढले असले तरी बेळगाव जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाला नसल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. तथापि संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्वांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणाखाली येण्यास सुरुवात झाल्यामुळे आरोग्य खात्याला दिलासा मिळाला असला तरी आता बर्ड फ्लूचे नवे संकट घोंगावत आहे. महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून तेथील कांही जिल्ह्यात कोंबड्या दगावल्यामुळे बेळगावसह राज्यात खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य खात्याने बजावले आहेत.
महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असला तरी बेळगाव किंवा कर्नाटकातील कोणत्याही भागात अद्याप बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याची नोंद नाही. त्यामुळे भीती बाळगण्याची गरज नाही, परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हा दक्षता अधिकारी डॉ. बाळकृष्ण तुक्कार यांनी स्पष्ट केले आहे.
बर्ड फ्लू झालेल्या पक्षाच्या संपर्कात आल्याने मानवाला आजाराची भीती असते. पक्षांचे कच्चे मांस खाल्याने आजार वाढण्याचा धोका असतो. डोळे नाक किंवा तोंडावाटे संसर्गाची शक्यता असते. त्यामुळे आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज असते.
ताप येणे, स्नायू दुखणे, सतत नाक वाहणे, पोटात वेदना जाणवणे, डोळे जळजळ होणे, घशात सूज येणे ही या रोगाची लक्षणे आहेत त्यामुळे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील लोकांनी मांसाहार खाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.