केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी येत्या सोमवार दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय महामार्ग परियोजनेचे उद्घाटन करण्यासाठी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
नागपूर येथून सोमवारी सकाळी 9 वाजता विशेष विमानाने केंद्रीय मंत्री गडकरी बेळगावच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. बेळगाव विमानतळावर त्यांचे 10 वाजून 40 मिनिटांनी आगमन होणार असून तेथून ते थेट नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
जिल्हा क्रीडांगणावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी 12 वाजता ते विमानाने हुबळीला रवाना होणार आहेत. हुबळीचा कार्यक्रम करून ते मंगळूर येथील समारंभास उपस्थित राहण्यासाठी प्रयाण करणार आहेत. मंगळूर येथील समारंभ आटोपल्यानंतर केंद्रीय मंत्री गडकरी पुनश्च नागपूरला जाणार आहेत.
या पद्धतीने सोमवारच्या आपल्या दौऱ्यामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एकूण तीन कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शवणारा असून यापैकी पहिला कार्यक्रम बेळगावात होणार आहे. शहरात त्यांचे सकाळी 10:40 ला आगमन होणार असून 11 वाजता ते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. सदर अर्धा -पाऊण तासाच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर ते पुन्हा सांबरा विमानतळाकडे रवाना होतील आणि तेथून हुबळीला प्रयाण करतील असे समजते.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गांच्या 23,972 कोटी रुपये खर्चाच्या आणि 238 कि. मी. लांबीच्या 5 प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ सोमवारी सकाळी होणार आहे.
बेळगावातील राष्ट्रीय महामार्गाच्या या 5 प्रकल्पांमध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे. 1) बेळगाव ते संकेश्वर हा 1479.3 कोटी रुपये खर्चाचा आणि 40.07 कि. मी. अंतराचा बेळगाव ते संकेश्वर 6 पदरी मार्ग, 2) महाराष्ट्र सीमेपर्यंतचा 1388.7 कोटी रुपये खर्चाचा आणि 69.17 कि. मी. अंतराचा सहापदरी संकेश्वर बायपास रस्ता, 3) राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 एए वरील बेळगाव -जांबोटी -साकलीम दरम्यानचा 246.78 कोटी रुपये खर्चाचे 69.70 कि. मी. अंतराच्या रस्त्याचे दुपदरीकरण, 4) विजापुरा मुरगुंडीपासूनच्या रस्त्याचे 79.70 कोटी रुपये खर्चाचे दुपदरीकरण, 5) सिद्धापूर ते विजापूर या 11.62 कि. मी. अंतराच्या रस्त्याचे 90.13 कोटी रुपये खर्चाचे दुपदरीकरण.