केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातर्फे राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण 238 कि. मी. लांबीच्या आणि 3,972 कोटी रुपये खर्चाच्या पाच प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ उद्या सोमवार दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
शहरातील नेहरूनगर येथील जिल्हा क्रीडांगण येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पायाभरणी समारंभ होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री निवृत्त जनरल डॉ. व्ही. के. सिंग व राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या समारंभास सन्माननीय अतिथी म्हणून केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण खात्याचे मंत्री प्रल्हाद जोशी हजर राहणार आहेत.
याव्यतिरिक्त बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती, मजुराई हज व वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, खासदार रमेश जिगजीनगी, खासदार मंगला अंगडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले व खासदार इरण्णा कडाडी यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील सर्व 7 विधानपरिषद सदस्य आणि 10 आमदार सदर समारंभाला उपस्थित राहणार आहेत.