कराड -बेळगाव व्हाया निपाणी रेल्वे मार्गासह चिकोडी लोकसभा आणि बेळगाव जिल्ह्यातील आवश्यक रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्याची मागणी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि धर्मादाय वक्फ व हजमंत्री शशिकला जोल्ले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. कराड -बेळगाव व्हाया निपाणी शेडबाळ -विजापूर आणि बेळगाव -कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी अनुदानाची गरज आहे. बेळगाव -धारवाड व्हाया कित्तूर नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. या संदर्भातील पुढील कार्यवाही सुरू केली जावी. कुडची, चिंचली, रायबाग आणि बागेवाडी तसेच हुक्केरी तालुक्यातील रेल्वे स्थानकांच्या विकासासह फलाटांची नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
कुडची रेल्वेस्थानकावर अन्य एक तिकीट काउंटर बसविले जावे. उगारखुर्द, रायबाग रेल्वे स्थानकावर वेगदूत थांबे निर्माण करावेत. बेळगाव -बेंगलोर रेल्वेसेवा महाराष्ट्रातील मिरजेपर्यंत विस्तारित केली जावी. बेळगाव जिल्हा हद्दीतून ज्या रेल्वेसेवा आठवड्यातून एक -दोन वेळा सुरू आहेत. त्या नियमित सुरू कराव्यात. मिरज -बेळगाव -हुबळी मार्गावर लोकल ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवावी. धारवाड -म्हैसूर -धारवाड मार्ग मिरजेपर्यंत वाढवावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी मंत्री जोल्ले व खासदार जोल्ले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी अन्य विषयांवर देखील चर्चा केली. निवेदन स्वीकारून संबंधित रेल्वे मार्गाबद्दल अहवाल मागवून आवश्यक योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी यावेळी दिले.