सोशल मीडियाला कुणीही गंभीरपणे घेत नाही असे म्हटले जाते मात्र सोशल मीडियाच्या एका पोस्ट मुळे कर्नाटकात दुर्लक्षित असलेल्या समाधी स्थळाचा विकास केला जाणार आहे.माजी सनदी अधिकारी आणि पानिपतकार विश्वासराव पाटील यांनी कर्नाटकातील होदेगेरे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांची समाधी स्थळ दुर्लक्षित आहे या समाधी स्थळावर छपर देखील नाही अशी पोस्ट टाकली होती त्या पोस्ट ची दखल घेत डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून या समाधी स्थळाचा विकास केला जाणार आहे.
कर्नाटकातील होदिगेरे (जि. दावणगिरी) येथे शिवरायांसारख्या महापुरुषाला आणि ‘महाराष्ट्र’ या कल्पनेला जन्म देणाऱ्या महाराष्ट्राचे महापिता पराक्रमी छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. गेल्या कित्येक वर्षापासून उघड्यावर दुर्लक्षित अवस्थेत असलेल्या या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार आणि सुशोभिकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने डॉ श्रीकांत शिंदे ट्रस्टमार्फत हादिगेरे येथे आज बुधवारी 5 लाख रुपयांचा धनादेश महाराजा शहाजीराजे स्मारक समितीकडे सुपूर्द करण्यात आला.
पानिपतकार विश्वास पाटील यांनी गेल्या महिन्यात कर्नाटकातील दावणगिरी जिल्ह्यातील हादिगेरे गावानजीक असणाऱ्या छ. शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट दिली. 23 जानेवारी 1664 ला याच परिसरात राजांचा घोड्यावरुन पडून अपघात झाला आणि इथेच त्यांचे महान निर्माण झाले. आज जेमतेम 20 गुंठे जागेत गावाबाहेरच्या माळावर राज्यांची अत्यंत छोटी एकाकी समाधी आहे. सरकार प्रशासनासह सर्वांचे दुर्लक्ष झाल्यामुळे शहाजी महाराजांच्या समाधीवर साधे गंजक्या पत्र्याचे सुद्धा छप्पर नाही. विपन्नावस्थेतील या समाधीबाबतची कैफियत विश्वास पाटील यांनी आपल्या फेसबुकवरील ब्लॉकद्वारे महाराष्ट्रासमोर मांडून समाधीच्या जीर्णोद्धारासाठी मदतीचे आवाहन केले होते.
पानिपतकार विश्वास पाटील यांच्या आवाहनाची महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आहे. या उभयतांनी छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाची संपूर्ण जबाबदारी उचलली आहे. त्याअनुषंगाने पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासमवेत मंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी आज बुधवारी सकाळी हादीगेरे येथील शहाजी राजांच्या समाधी स्थळाला भेट दिली. त्यांनी प्रथम महाराजांच्या समाधीवर केशरी वस्त्र चढवून विधिवत पूजा केली. त्याचप्रमाणे समाधीवर पुष्पहार आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. याप्रसंगी स्वराज्य संकल्पक छ. शहाजी महाराज की जय, छ. शिवाजी महाराज कि जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मंगेश चिवटे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे ट्रस्ट मार्फत 5 लाख रुपयांचा धनादेश महाराजा शहाजीराजे स्मारक समितीचे अध्यक्ष मल्लेशराव शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ट्रस्टचे अन्य सदस्य आणि शिवप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, महाराष्ट्राचे महापिता स्वराज्य संकल्पक छ. शहाजी महाराज यांची समाधी या ठिकाणी होदिगेरे येथे आहे. या समाधीच्या ठिकाणी कोणतेही छप्पर अथवा स्मारक नाही. प्रख्यात लेखक संभाजीकार विश्वास पाटील यांनी गेल्या कांही दिवसांपूर्वी या समाधी स्थळाला भेट देऊन तिच्या दुरवस्थेबद्दल हळहळ व्यक्त केली. तसेच महाराष्ट्राचे महापिता छ. शहाजी महाराज यांनी सर्वप्रथम स्वराज्याची संकल्पना मांडली त्यांची समाधी उघड्यावर असल्याबद्दल त्यांनी समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराबद्दल आवाहन केले. त्यांच्या फेसबुक वरील आवाहनाची महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांचे पुत्र कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दखल घेतली असून तात्काळ त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांनी येथे समाधीस्थळी पाठवले आहे.
या समाधीचा जीर्णोद्धार आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी येथील ट्रस्टला प्राथमिक स्वरूपात 5 लाख रुपयांचा धनादेश आज आम्ही सुपूर्द केला. आम्ही इथेच थांबणार नसून मंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराच्या संपूर्ण खर्च डॉ. श्रीकांत शिंदे ट्रस्ट मार्फत आपण उचलणार असल्याचे स्पष्ट केले आहे, अशी माहितीही मंगेश चिवटे यांनी दिली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार येत्या 26 फेब्रुवारी रोजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे उभयता स्वतः हादिगेरे येथील छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देणार आहेत.