बेळगाव उत्तर मतदार मतदार संघातील विविध विकास कामांना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज चालना दिली. त्यामुळे श्रीनगरमधील शिवालय कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कंपाऊंड भींत, महांतेशनगर मधील मुख्य रस्त्याच्या कामासह गजानन गल्ली व दीपक गल्ली येथील विकास कामे हाती घेण्यात आली आहेत.
शहरात बहुतांश भागात मात्र स्मार्टसिटीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. आपल्या मतदारसंघातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नयेत यासाठी संबंधित अर्धवट अवस्थेतील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमदार ॲड. अनिल बेनके यांनी कंबर कसली आहे.
तसेच याबाबत अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना करून काम पूर्ण होत आहे की नाही याकडे लक्ष देण्याची सक्त सूचना करत आहेत. आमदारांच्या हस्ते आज शनिवारी सकाळी श्रीनगरमधील शिवालय कंपाऊंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन कंपाऊंड भींत, महांतेशनगरमधील मुख्य रस्त्याच्या कामासह गजानन गल्ली व दीपक गल्ली येथील विकास कामांचे भूमिपूजन करून त्यांना चालना देण्यात आली.
विविध विकास कामांच्या शुभारंभानंतर बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी बेळगाव उत्तर मतदार संघाच्या विकासासाठी 200 कोटीच्यावर निधी मंजूर झाला असून हाती घेण्यात आलेली कामं लवकरच पूर्ण होणार असल्याचे सांगितले.
तसेच 125 कोटी रुपयांची कामे अजूनही शिल्लक असून यातील फोर्टीन फायनान्स, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. तसेच शहरातील बरीचशी कामे पूर्ण झाल्याने सरकारकडून पुन्हा 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या निधीमधून उर्वरित विकास कामे करणार असल्याचे सांगून जनतेने सरकारने केलेल्या विकास कामांचा सदुपयोग करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहनही आमदार ॲड. बेनके यांनी केले. यावेळी नगरसेविका लक्ष्मी राठोड, भाजप नेते महांतेश मुकुंदा यांच्यासह स्थानिक नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते.