महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा करणाऱ्या माजी आमदार अरविंद पाटील यांना एकीने उत्तर देण्याचा निर्धार करून निषेध खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या बैठकीत नोंदवण्यात आला. तसेच मार्च महिन्यात मराठी नाही तर टोल नाही हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिमाप्रश्न आणि इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका युवा समितीची बैठक गुरुवारी शिवस्मारक येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील होते. यावेळी पाटील यांनी सीमाप्रश्न निर्माण झाल्यापासून मराठी भाषिक प्रामाणिकपणे आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी लढा देत आहेत.
येणाऱ्या काळात सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी महत्वपूर्ण घडामोडी घडणार आहेत अशावेळी मराठी भाषिकांनी संघटित होणे गरजेचे असून सीमालढा निर्णायक टप्प्यावर आलेला असताना सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. आतापर्यंत अनेकांनी समितीशी द्रोह केला आहे. त्याच प्रमाणे माजी आमदार पाटील यांनी समितीशी प्रतारणा केली आहे मात्र दरवेळी समिती तावून-सुलाखून आपले ध्येय गाठत आहे. त्यामुळे इतर गोष्टीवर लक्ष न देता समिती कशी बळकट होईल याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे असे मत व्यक्त केले.
कार्याध्यक्ष किरण पाटील यांनी येणाऱ्या काळात मराठी नाही तर टोन नाही हे आंदोलन हाती घेतले जाणार असून येणाऱ्या काळात खानापूर सह परिसरातील अनेक गावांना टोलमुक्ती द्यावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे अशी माहिती दिली.
सचिव सदानंद पाटील यांनी तालुक्यातील अनेक गावांचे रस्ते खराब झाले आहेत त्या रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करावी यासाठी विविध गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन आंदोलन हाती घ्यावे असे मत व्यक्त केले.
एपीएम सदस्य मारुती गुरव यांनी येणाऱ्या काळात समितीचे संघटन बळकट व्हावे त्या दिशेने उपक्रम हाती घ्यावे तसेच आतापासूनच संघटना वाढीसाठी ठिकठिकाणी बैठक घेऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी केली.
राजू पाटील यांनी प्रास्ताविक तर प्रतीक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. बैठकीला हलशी, नंदगड, जांबोटी, गर्लगुंजी, खानापूर आदी भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.