मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुंबई येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला समस्त सीमावासीयांतर्फे पाठिंबा दर्शविताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमध्ये छेडण्यात आलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शविला.
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानामध्ये खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काल शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. छत्रपती संभाजी राजांना पाठिंबा दर्शवण्यासाठी छत्रपती मालोजीराजे भोसले यांच्या आशीर्वादाने कोल्हापूर येथील दसरा चौकामध्ये देखील मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला प्रारंभ करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती मिळताच सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली माजी ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, मुतगा ग्रामपंचायत अध्यक्ष भालचंद्र पाटील आणि पुंडलिक पावशे यांनी आज सकाळी कोल्हापूर येथे बेमुदत उपोषण आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला.
दसरा चौकात आंदोलनस्थळी बोलताना माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. आम्ही कांही भीक मागत नाही तो आमचा अधिकार आहे. सीमेवर लढण्यासाठी तुम्हाला मराठी माणसं लागतात मग आरक्षणासाठी ती का नको आहेत? असा सवाल करून नेहमीप्रमाणे आपले परखड विचार व्यक्त केले.
सुनील अष्टेकर यांनी आपले विचार व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची स्थापना करून जर बारा बलुतेदार, अठरा पगड जाती आणि 32 भाषांना एकत्र केले नसते तर आज आपल्या देशाचे नांव हिंदुस्थान ऐवजी दुसरेच कांहीतरी असते असे सांगून मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविणारे विचार व्यक्त केले. भालचंद्र पाटील व पुंडलिक पावशे यांचीही समयोचित भाषणे झाली.