दोन मुलांसह अरगण तलावात उडी घेऊन मातेने आत्महत्या केल्याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून काल एकाला अटक केल्यानंतर आज मयत क्रीशाचा पती मनिष केशवानी याला पोलिसांनी अटक झाली आहे.
क्रीशा मनीष केशवानी या महिलेने गेल्या शुक्रवारी विजय नगर गणपती मंदिरानजीकच्या अरगन तलावांमध्ये आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती.
याप्रकरणी पाच जणांवर कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घेऊन मृत क्रीशाचा भाऊजी विकी छटानी (रा. उत्तर गोवा) याला काल गोव्यातून अटक केली होती.
त्यानंतर आज पोलिसांनी क्रीशाचा पती मनीष केशवानी याला अटक केली आहे. पोलिसांनी संबंधित पाचही आरोपींवर भादवि 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका क्रीशाच्या माहेरच्या मंडळींनी घेतली होती. मात्र गोव्यातून विकी छटानी याला अटक झाल्यानंतर माहेरच्या मंडळींनी क्रीशासह तिच्या मुलांवर मिरज येथे अंत्यसंस्कार केले.
आता मनीष केशवानी याच्या अटकेमुळे या प्रकरणातील पाच आरोपींपैकी दोघेजण गजाआड झाले असून अन्य तिघे संशयित फरारी आहेत. कॅम्प पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न चालविले आहेत.