राज्य सरकारकडून यावर्षी बेळगावमध्ये अत्याधुनिक किडवाई प्रादेशिक केंद्र सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आज दिली.
बेंगलोर येथील कर्करोगावरील किडवाई संस्थेमधील गरीब कर्करोगग्रस्त मुलांसाठी अस्ती मज्जातंतू प्रत्यारोपण सुविधेचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री डॉ. सुधाकर बोलत होते. अस्ती मज्जातंतू प्रत्यारोपण हा अतिशय महागडा उपचार असून गरीब रुग्णांच्या तो आवाक्याबाहेरील आहे.
मात्र किडवाईमधील या नव्या सुविधेमुळे यापुढे कोणीही कर्करोग उपचारापासून वंचित राहणार नाही. सध्या याठिकाणी दोन मुलांवर उपचार करण्यात आले आहेत असे सांगून आम्ही यापूर्वी तुमकुर, कलबुर्गी, शिमोगा आणि म्हैसूर येथे किडवाई प्रादेशिक केंद्र सुरू केली आहेत.
आता बेळगावातील केंद्र या वर्षभरात सुरू होईल असे मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.