बेळगावची होतकरू क्रीडापटू मलप्रभा जाधव हिने कुराश असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हरियाणा येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कुराश अजिंक्यपद स्पर्धेतील 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.
एशियन मेडल मिळवल्या काही काळासाठी दुखापतीमुळे दूर राहिलेली मलप्रभा जाधवने पुन्हा जोरदार मुसंडी मारत पदकांची कमाई करायला सुरुवात केली आहे.
हरियाणा येथील राष्ट्रीय स्पर्धेत मलप्रभा जाधव हिने पाच लढतींमध्ये अनुक्रमे हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पुन्हा अंतिम फेरीमध्ये पंजाबच्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून अजिंक्यपद मिळवले.
या यशामुळे तिची पुढील महिन्यात ताजिकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय चमूत निवड झाली आहे.
मलप्रभा हिला प्रशिक्षक त्रिवेणी एम. एन., जितेंद्र सिंग आणि फिटनेस कोच ओमकार मोटर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभत आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीबद्दल मलप्रभा जाधव येथे सर्वत्र अभिनंदन होत आहे.