अल्पसंख्यांक आयोगाच्या आदेशानुसार मराठी आणि उर्दू शाळांना आपल्या मातृभाषेत पत्र व्यवहार करण्याचा हक्क दिला जावा अशा मागणीचा ठराव खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची मासिक बैठक आज शनिवार दुपारी राजा शिवछत्रपती स्मारक येथे समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव यशवंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी प्रारंभी खानापूर तालुका म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते कै. पांडुरंग लक्ष्मण काकतकर नंदगड, कै. स्वरसम्राज्ञी कीर्ती जयराम शिलेदार पुणे, भारताच्या गानकोकिळा कै. लतादीदी दीनानाथ मंगेशकर मुंबई यांना व खानापूर तालुक्यातील म. ए. समितीचे दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खानापूर तालुक्यात मराठी शाळांची संख्या 70 टक्के आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या अनेक शाळा आहेत. खानापूर तालुका हा भाषिक अल्पसंख्यांक वर्गात मोडतो. त्यामुळे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांना आपल्या मातृभाषेत पत्र व्यवहार करण्याचा हक्क दिला आहे. परंतु खानापूर तालुक्याचे क्षेत्र शिक्षणाधिकारी लक्ष्मण यक्कुंडी हे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे आदेश पायदळी तुडवून मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांवर कानडी भाषेतूनच पत्रव्यवहार करण्यासाठी भाग पाडत आहे.
त्यामुळे मराठी आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांची कुचंबणा होत आहे. यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने या संदर्भात सदरी शाळांना हक्क मिळवून देण्यासाठी खानापूर तालुक्याच्या तहसीलदारांना व क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रत्यक्ष भेट घेण्याचा ठराव बैठकीत संमत करण्यात आला.
या बैठकीचे प्रास्ताविक व स्वागत समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले. यावेळी बोलताना अध्यक्ष माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी भाषिक अल्पसंख्यांक हक्कांची माहिती देऊन शाळांच्या कार्यालयीन कागदपत्रे आणि पत्र व्यवहारातील कन्नड सक्ती क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मागे घ्यावी व मराठी आणि उर्दू शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा असे आवाहन केले.
बैठकीस पुंडलिकराव चव्हाण माजी अध्यक्ष म. ए. समिती, विवेक गिरी, प्रकाश चव्हाण, मुरलीधर पाटील चेअरमन भू विकास बँक खानापूर, नारायण कापोलकर अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान खानापूर, विठ्ठल गुरव माजी ता. पं. सदस्य, शिवाजी सहदेव पाटील, शिवाजी कल्लाप्पा पाटील, नारायण लाड, विलासराव बेळगावकर माजी जि. पं. सदस्य, विशाल पाटील माजी जि. पं. सदस्य, डॉ. एल.एच. पाटील, रमेश देसाई माजी ता. पं. सदस्य, बाळासाहेब शेलार माजी ता. पं. सदस्य, डी.एम.भोसले, एम. ए. खांबले, दीपक देसाई, अविनाश पाटील, अनिल पाटील माजी नगरसेवक, रुक्माना झुंझवाडकर ग्रा. पं. सदस्य, वसंत सुतार, माऱ्याप्पा पाटील माजी ग्रा. पं. सदस्य, प्रवीण पाटील ग्रा. पं. सदस्य, इत्यादींनी आपले विचार मांडले. आबासाहेब दळवी त्यांच्या आभार प्रदर्शनाने बैठकीची सांगता झाली.