Monday, January 20, 2025

/

“कारागृहातील रमाकांत…”

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : बेंगळूर सदाशिवनगर मध्ये डिसेंबर २०२१ मध्ये झालेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्ती विटंबनेनंतर बेळगावमधील शिवसैनिक निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. यादरम्यान कर्नाटक सरकारने षडयंत्र रचून निष्पाप मराठी भाषिकांवर खोटे गुन्हे दाखल केले. यामध्ये श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, यासह एकूण ३८ तरुण मराठी युवकांना अटक करण्यात आली. तब्बल ४७ दिवसानंतर त्यांची सुटका करण्यात आली असून या ४७ दिवसात कारावासात आलेल्या अनुभवांसंदर्भात रमाकांत कोंडुस्कर यांच्याशी ‘बेळगाव लाईव्ह’ने केलेली खास बातचीत…..

38 भगवी शिववादळे दगडी भिंतीच्या आत घोंगाऊ लागली ते 47 दिवस ,एकेक दिवस नव्या नव्या अनुभवाला सामोरा जाणारा. शिवशंभूचं चैतन्य अंगी बाणवलेले हे रसरशीत हिंदू तरुण आत्मसन्मानासाठी या तुरुंगात येऊन दाखल झालेले.सगळेच जवळ जवळ तीस पस्तीसच्या आसपासचे!मी त्यांच्यातला जाणता झालेला शिवभक्त!! काही शिववर्ष त्यांच्या पेक्षा माझी अधिक झालेली,पण सगळेच एकाच प्रेरणेने भारावलेले समवयस्कासारखे…

समस्त मराठीजनांचे आराध्यदैवत.. म्हणजेच छत्रपती शिवराय… छत्रपती शिवराय म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय.. याच छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची बेंगळूर मधील सदाशिवनगर येथे काही समाजकंटकांनी विटंबना केली… आणि लगोलग याचे पडसाद बेळगावमध्ये उमटले… हजारो शिवभक्त रस्त्यावर उतरले… प्रशासनास वेठीला धरले… परंतु आधीच मराठी भाषिकांवर तिरकी नजर असणाऱ्या कर्नाटकी प्रशासनाने मात्र आपला कूट हेतू सिद्ध करत निष्पाप मराठी भाषिकांवर अन्यायी कायद्याचा बडगा उगारला… आणि निषेध व्यक्त करणाऱ्या ३८ मराठी तरुणांवर राजद्रोहासारख्या गुन्ह्याखाली अटकेची कारवाई केली. यामध्ये प्रामुख्याने श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह ३८ जणांना अटक करण्यात आली. कारागृहात तब्बल ४७ दिवस या साऱ्यांना डांबण्यात आले… या ३८ मराठी भाषिकांमध्ये काही युवक हे विद्यार्थी होते तर काही नोकरी व्यवसाय करणारे होते….

अचानकपणे अटक झाल्यानंतर आपल्या भविष्याची चिंता साहजिकच कुणालाही येईल.. परंतु अटकेनंतरदेखील कारागृहातील प्रत्येक मराठी भाषिकांना वडिलधार्यांप्रमाणे प्रोत्साहन देत आपल्याला कोणत्या गुन्ह्याखाली नाही तर घटनेने दिलेल्या अधिकाराच्या लढाईत आपण अटक झालो आहोत असे सांगत रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रत्येकाचे मनोबल वाढवले… Ramakant konduskar

रमाकांत कोंडुस्कर यांची कारागृहात जाण्याची हि पहिलीच वेळ नाही.. त्यांना यापूर्वी झालेल्या आंदोलनात देखील अनेकवेळा अटक झाली आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत न डगमगता कारागृहातील त्या ४७ दिवसांमध्ये दररोज प्रत्येक तरुणाचे मनोबल वाढविण्याचे कार्य रमाकांत कोंडुस्कर यांनी केले. ४७ दिवस वाया न घालवता प्रत्येक क्षण हा सत्कारणी लावण्याचा पण रमाकांत कोंडुस्कर यांनी घेतला. कारागृहात दररोज येणारा आहार प्रत्येकापर्यंत पोहोचतो कि नाही याची शहानिशा करणे, प्रत्येक तरुणाचे मनोबल वाढविणे, आणि एखाद्या सवंगड्याप्रमाणे त्यांना जपणे आणि सुखरूपपणे कशा पद्धतीने तुरुंगाबाहेर काढता येईल याचा विचार रमाकांत कोंडूस्करांनी केला. या काळात प्रत्येक तरुणाला त्यांनी धीर दिला. तुरुंगात पुरविण्यात येणारे जेवण सर्वात आधी प्रत्येकपर्यंत पोहोचवून त्याची शहानिशा करून त्यानंतर आपण जेवण करणे हि रमाकांत कोंडूस्करांची दिनचर्याच झाली होती. या ४७ दिवसात आपल्या मुलाप्रमाणे प्रत्येक मराठी तरुणाची रमाकांत कोंडूस्करांनी काळजी घेतली. केवळ आहारच नाही तर तुरुंगात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या अनेक थोर पुरुषांचा इतिहास देखील त्यांनी युवकांना सांगितला. शिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिघोष, शंभू महाराज ग्रंथ, प्रा. आनंद मेणसे यांचे सीमाप्रश्नावर आधारित सीमासंघर्ष ही पुस्तक या ४७ दिवसात रमाकांत कोंडुस्कर यांनी वाचली आहेत.

कारागृहात ४७ दिवस राहूनदेखील प्रत्येक तरुणाचे मनोबल वाढवून, कारागृहातील वातावरणापेक्षा कौटुंबिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत रमाकांत कोंडुस्कर यांनी तरुणांना प्रोत्साहन दिले आहे. सहसा कारागृहातील वातावरण हे थोड्याफार प्रमाणात दडपणाचेच असते. शिवाय नुकतीच आपल्या करियरची दिशा ठरवणारे युवक अचानकपणे झालेल्या अटकेमुळे सैरभैर झाले. अशा परिस्थितीत देखील खंबीरपणे उभं राहून प्रत्येकाला तुरुंगाबाहेर येईपर्यंत सांभाळण्याचे मोलाचे काम रमाकांत कोंडुस्कर यांनी केले आहे. मराठी भाषिकांच्या लढ्यातील रमाकांत कोंडूस्करांचे हेही एक योगदान म्हणावे लागेल.

तुरुंगाले दिवस काही शिकवणारे, काही शिकायला लावणारे, तुरुंगालाही काही देणारे असे.आम्ही शिक्षा भोगायला आलो नव्हतो तर ऊर्जा जपायला आलो होतो. तुरुंगालाही शिव निष्ठा समजावून सांगायला आलो होतो. भिंतीआडचा दिवस उगवायचाच पाच वाजता. वाऱ्याची घुसमट करणारा. सकाळी उठून विधी आटोपून वाचन चालू व्हायचं. जगण्याच्या धबडग्यात असा निवांत वेळ मिळावा तर कधी?अनेक चरित्र वाचायची होती… समजावून घ्यायची होती. सीमाप्रश्न मुळातून जाणून घ्यायचा होता, निवांत वेळ असा सापडलेला. मनासारखा.शिवशंभू चरित्र, सावरकरांचं क्रांती घोष, सीमा प्रश्नावरची पुस्तकं यांचे वाचन चालू व्हायचं, एकमेकांबरोबर चर्चा व्हायच्या. काळीज घट्ट करायला ही सगळी ऊर्जास्त्रोत्र उपयोगी पडायची.कधी कुणाचं काळीज हलकं झालं,तर त्याच्या छातीचा कोट बुलंद करण्यासाठी उपयोगी पडायची. वाचन व्हायचं त्यानंतर विटांच्या चुलीवर लाकडांचा जाळ लाऊन अडतीस जणांसाठी चहाचे भांडे चुलीवर चढवायचे. अडतीस जणांचा चहा करताना मला जाणवायचं हा केवळ चहा नाही तर मी यात जीवन रस ओततोय.या एकाच भांड्यात शिजणाऱ्या चहाने मी सत्तेचाळीस दिवस सगळ्यांना एकत्र बांधून ठेवत होतो.त्या नंतर यायचा जेलचा नाश्ता, मग अंघोळ….नित्य शिव प्रतिमापूजा आणि बराकी बारकीतून घुमायचा शिवरायांचा प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र…

Ramakant

दिवसभर एकत्र बसून आम्ही विविध विषयांवर…समाज कारणावर चर्चा करायचो.मध्येच तारखांसाठी बाहेर जायला लागायचं..त्यावेळी कार्यकर्ते घरचे लोक भेटायचे.. उमाळे भरते यांची देवाणघेवाण व्हायची. काही कार्यकर्त्यांच्या घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. बाहेरचे कार्यकर्ते किल्ला लढवायचे, त्यांच्या घरी मदत पोचवली जायची,हे ऐकून समाधान वाटायचं.

जेष्ठ म्हणून अनेक कार्यकर्त्यांना तरुणांना समजावून सांगायला लागायचं.ते काम निष्ठेने करत राहायचो.आमच्यात दोघे तिघे वारकरी होते रात्री नऊ वाजता जेवण झाल्यावर भजन रंगायची सगळे आम्ही त्यात दंगून जायचो आणि नंतर गप्पा मारत मारत झोपेच्या आधीन व्हायचं.

तुरुंगाने काही काढून घेण्यापेक्षा खूप काही दिलं!अभेद्य भिंतीसारखं लढण्याची चिकाटी दिली. कोणती ज्योत विझतअसेल तर त्यात परत चेतना जागवण्याची शक्ती दिली. जेष्ठांना कसं वागवायचं ही भक्ती आणि तरुणांबरोबर तरुण व्हायची कुवत दिली.,आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आत्मसन्मानासाठी तुरुंगात गेलं तरी त्यात काय वावगं नसतं ही आठवणींची शिदोरीही दिली.प्रत्येक पुढच्या लढ्याचे बीज या तुरुंगवारीत राहिल हे निश्चितचं…

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.