निपाणी ते कित्तूर दरम्यानच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शेजारी ‘जल शक्ती’ विकास प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगाव येथे केली.
राष्ट्रीय महामार्ग शेजारी गावं आणि प्रदेशात जल शक्ती विकास प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे पाण्याचे संवर्धन, जमिनीखालील भूजल पातळीत वाढ, नाल्यांसह इतर जल घटकांची सुधारणा यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी ज्या पद्धतीने हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविला आहे, त्या धर्तीवर राष्ट्रीय मार्ग महामार्गाशेजारी जलशक्ती प्रकल्प सुरू केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम या प्रकल्पाची सुरुवात केली जाईल आणि त्यानंतर तो संपूर्ण कर्नाटकात राबविला जाईल. बेळगाव जिल्ह्यात रस्त्यांची क्रांती होत असून विशेष करून महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणाऱ्या रस्त्यांच्या बाबतीत हे घडत आहे.
देशातील महामार्ग तयार करताना नितीन गडकरी यांनी वेग आणि दर्जाच्या बाबतीत नवी मानकं प्रस्थापित केली आहेत असे सांगून रस्त्यांमुळे फक्त आर्थिक विकास होत नाही तर देशातील एकात्मता देखील वृद्धिंगत होते, तसे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.