खाजगी भाजी मार्केट बेकायदा आहे असा आरोप करत एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारी एकीकडे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत असताना दुसरीकडे वेगळा पवित्रा घेताना आमच्या भाजी मार्केटवर प्रशासकाची नियुक्ती करा, वाटल्यास आमच्याकडून आवश्यक कर जमा करून घ्या, अशी मागणी जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी केली आहे.
गेलेत सहा दिवसांपासून बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) आवारामध्ये जय किसान खाजगी होलसेल भाजीमार्केट विरोधात आंदोलन सुरू आहे. काल सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची मनधरणी केली. जय किसानच्या विरोधात भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिद्धगौड मोदगी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकार्यांनी मनधरणी करून देखील आंदोलनकर्ते व्यापारी आणि कृषक समाज समाजाचे नेते मोदगी आपल्या मागणीवर ठाम असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर गांधीनगर येथील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी आपला खुलासा केला आहे. सर्व कायदेशीर पूर्तता करून नियमानुसार जय किसान भाजीमार्केटची स्थापना करण्यात आली असल्याचा त्यांचा दावा आहे. तथापि या भाजीमार्केट संदर्भात कोणाचा आक्षेप असेल तर जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटवर खुशाल प्रशासकाची नियुक्ती केली जावी. प्रशासकाच्या आदेशानुसार आम्ही आमचे भाजी खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यास करण्यास तयार आहोत. याखेरीज कांही अतिरिक्त कर भरावयाचे असल्यास ते देखील भरण्यास आम्ही तयार आहोत असे स्पष्टीकरण जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी दिले आहे.
जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी कंग्राळी खुर्द येथील एपीएमसी भाजी मार्केटचे हायटेक भाजी मार्केटमध्ये रुपांतर करण्यात आले. त्यावेळी व्यापाऱ्यांना गाळे देते म्हणून बोलावून घेण्यात आले. मात्र बहुतांश व्यापाऱ्यांना तेथे गाळे मालक बनविण्याऐवजी पोट भाडेकरू म्हणून ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून दरमहा 12 ते 18 हजार रुपयांपर्यंत भाडे वसुली केली जात होती. या पद्धतीने किती दिवस भाडे भरणार म्हणून संबंधित व्यापाऱ्यांनी स्वतःचे भाजी मार्केट निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात गेल्या चार -पाच वर्षापासून सेस भरून घेतला जात नाही. बेळगाव एपीएमसी व्यवस्थापनाने तर सदर कालावधीत एक पैसा सेस भरलेला नाही असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
केपीसीसी कार्याध्यक्ष यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी बेळगावात तिसऱ्या होलसेल भाजी मार्केटची उभारणी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे जय किसान भाजी मार्केटच्या अध्यक्षांसह तेथील समस्त व्यापाऱ्यांनी स्वागत केले आहे. हे तिसरे भाजी मार्केट स्थापन झाल्यास तीनही भाजी मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना त्यांचा चांगला फायदा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यातील तरतुदीनुसार कलम 72 /सी नियम 87/बी अंतर्गत कोणीही स्वतःचे खाजगी भाजीमार्केट उभारू शकते. मात्र सरकारच्या अटीनियमांनुसार भाजी मार्केटची उभारणी केली जाणे गरजेचे आहे. जय किसान भाजीमार्केट देखील या कायद्यानुसार उभारण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट मधील व्यापाऱ्यांनी थेट बेंगलोर येथून भाजी मार्केटसाठी अधिकृत परवाना मिळविला आहे. याव्यतिरिक्त
सरकारचे बेळगाव एपीएमसी भाजी मार्केट हे राष्ट्रीय महामार्गापासून दूरच्या अंतरावर पडते. त्यामुळे बेळगाव तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या शेतकऱ्यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागतो.
याव्यतिरिक्त बेळगावात एका ऐवजी दोन होलसेल भाजी मार्केट असतील तर स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला जादा दर मिळू शकतो. सर्व सामान्य ग्राहकांसाठी देखील ही बाब सोयीची ठरू शकते. त्यामुळे सरकारी नियम पाळून जर खाजगी भाजी मार्केट सुरू राहणार असेल तर त्याला आक्षेप घेतला जाऊ नये, असे मत व्यक्त केले जात आहे.