बेळगाव रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांसोबत भारत रत्न घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळाही उभारण्यात यावा, अशी मागणी दलित संघटनांनी केली आहे.
शहरातील विविध दलित संघटनांनी आज बुधवारी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर स्वातंत्र्यसेनानी संगोळ्ळी रायण्णा, राणी कित्तूर चन्नम्मा, महात्मा गांधी आदींचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी ऑल इंडिया दलित यूथ ऑर्गनायझेशनच्या नेतृत्वाखाली विविध दलित संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुधीर चौगुले यांनी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी स्वातंत्र्य सेनानी संगोळ्ळी रायण्णा, राणी कित्तूर चन्नम्मा, महात्मा गांधी आदींच्या पुतळ्यासह डॉ. आंबेडकर यांचाही पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांच्याकडेही करण्यात आली असल्याचे सांगितले.
खासदार अंगडी यांच्याकडून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी श्रीशा चौगुले, मल्लेश चौगुले, सागर चौगुले, सुधीर चौगुले, संतोष कांबळे, सुनील कोलकार, सदा कोलकार, मनोज चौगुले, विजय बोजराज, हलगेकर आदी उपस्थित होते.