सरकारी बाबू लोकांचा अर्थात सरकारी अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणत्याच बेकायदेशीर धंद्याची भरभराट होत नाही. शहरापासून कांही अंतरावर बेधडक सुरू असलेले एक बेकायदेशीर औद्योगिक केंद्र हा त्याचा पुरावा आहे.
शहरानजीकच्या या औद्योगिक केंद्रामध्ये कॉंक्रीट मिक्स आणि भुयारी गटारीच्या पाईपचे (युजीडी) उत्पादन करून त्यांचा सरकारी कामांसाठी पुरवठा केला जातो. संबंधित खात्याची परवानगी न घेता शेत जमिनीमध्ये हे औद्योगिक केंद्र बेधडक सुरू आहे. या गैरप्रकाराची माहिती असूनही महसूल अधिकारी त्याकडे कानाडोळा करत असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोणतेही औद्योगिक केंद्र सुरु करायचे झाल्यास त्यासाठी अधिकृत औद्योगिक क्षेत्रातील जागा घ्यावी लागते. जर तशी जागा उपलब्ध नसेल तर निश्चित केलेल्या अन्य जागेचे जिल्हा उद्योग केंद्र आणि स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शेत जमिनीतून बिगर शेत जमिनीमध्ये रूपांतर करून घ्यावे लागते. तथापि हे सर्व नियम धाब्यावर बसवून शहरानजीकचे संबंधित औद्योगिक केंद्र कडोली ग्रामपंचायत हद्दीतील आंबेवाडी -कडोली रस्त्यालगत शेतजमिनीत सुरू करण्यात आले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या तीन वर्षापासून हे बेकायदा केंद्र धडाक्यात सुरू आहे. त्याचप्रमाणे बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत यूजीडी पाईप लाईन आणि व्हाईट टॉपिंगसाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला या केंद्राकडूनच प्रामुख्याने यूजीडी पाईप आणि काँक्रीट मिक्सचा पुरवठा केला जातो.
या बेकायदेशीर केंद्रासंदर्भात तहसीलदारांसह संबंधित खात्याकडे वारंवार तक्रार करून देखील अद्याप त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे कडोली आणि परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले. त्याचप्रमाणे सदर औद्योगिक केंद्राच्या मालकाला राजकीय वरदहस्त लाभला असल्यामुळे तहसीलदार तथा अन्य अधिकारी त्याच्यावर कारवाई करण्यास धजावत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या या औद्योगिक केंद्रामुळे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाचा त्रास स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत असून पाईप आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे गावाच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
दरम्यान, सहाय्यक महसूल आयुक्त रवी कर्लिंगणावर यांनी संबंधित औद्योगिक केंद्र शेत जमिनीचे बिगर शेत जमिनी मध्ये रूपांतर करून उभारण्यात आले असावे असे सांगितले. तथापि जर कोणी शेत जमिनीचा गैरवापर करून नियमांचे उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
News courtsy -the new indian express