भारत आणि जपान यांच्यामधील ‘धर्म गार्डियन -2022’ हा संयुक्त लष्करी सराव बेळगाव येथील लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी येत्या 27 फेब्रुवारी ते 10 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
धर्म गार्डियन -2022 हा लष्करी सराव भारतात गेल्या 2018 पासून आयोजित केला जाणारा वार्षिक लष्करी प्रशिक्षण उपक्रम आहे. विशेष म्हणजे भारत विविध देशांसमवेत हा लष्करी प्रशिक्षण सराव करत आला आहे. यावेळी जपान सोबत केला जाणारा ‘धर्म गार्डियन’ हा सराव सध्याच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उभय देशांसाठी सुरक्षेच्या आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने निर्णायक आणि लक्षणीय असा आहे. प्लाटून पातळीवर हा सराव जंगल प्रदेशासह निमशहरी व शहरी भूप्रदेश व्याप्तीत केला जाणार आहे.
भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमधील 15 व्या बटालियनमधील युद्धनिपुण अनुभवी तुकड्या (ट्रूप्स) आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सची (जेजीएसडीएफ) 30 वी इन्फंट्री रेजिमेंट यंदाच्या संयुक्त लष्करी सरावामध्ये सहभागी होणार आहेत. या सरावादरम्यान जंगल प्रदेश आणि निमशहरी व शहरी भूप्रदेशातील विविध लष्करी मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणीचे तंत्र याची देवाण-घेवाण केली जाणार आहे. जपानच्या ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स कन्टींजन्टचे आज सरावाच्या ठिकाणी आगमन झाले असून भारताकडून त्यांचे उबदार स्वागत करण्यात आले.
भारत आणि जपान यांच्यातील या 12 दिवसांच्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान हाऊस इंटर्व्हेंशन्स ड्रील्स, निमशहरी भूप्रदेशातील अतिरेक्यांच्या छुप्या ठिकाणांवर छापे मारणे, युद्ध प्रथमोपचार, निशस्त्र युद्ध, विकसित रणनीतीचे नियोजन आणि अंमलबजावणी आदी विविध प्रकार आणि त्याची देवानघेवान, संयुक्त रणनितीवर चर्चा, संयुक्त प्रात्यक्षिके आदींचा समावेश असणार आहे.
सदर संयुक्त लष्करी सरावाचा प्रमाणीकरण सराव (व्हॅलिडेशन एक्सरसाईज) येत्या 8 आणि 9 मार्च 2022 रोजी होणार आहे. लष्करा -लष्करामधील संबंध वृद्धिंगत करणे, दोन्ही दलांमधील कृतिशीलता वाढविणे, याबरोबरच जागतिक दहशतवादाचा सामना करण्यासाठीचे रणनीती कौशल्य वाढविण्यावर ‘धर्म गार्डियन -2022’ या संयुक्त लष्करी सरावामध्ये भर दिला जाणार आहे.