हिजाब आणि बुरखा परिधान करून पूर्वतयारीचा परीक्षेस बसण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे लिंगराज कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने केली.
हिजाब वादाचे पडसाद गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव शहरात सातत्याने उमटू लागले आहेत. गेल्या बुधवारी महाविद्यालय सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील लिंगराज कॉलेजमध्ये 7 विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करून आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ उडाला होता.
‘परीक्षा नको, पण हिजाब हवा’ असे सांगत या विद्यार्थीनीने पूर्वतयारीचा परीक्षेवर बहिष्कार घातला होता. त्यावेळी न्यायालयीन आदेश असल्याने हिजाब परिधान करणे अयोग्य असल्याचे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परीक्षेला बसावयाचे असेल तर हिजाब परिधान न करता बसा असेही संबंधित विद्यार्थिनींना त्यावेळी समजावण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर लिंगराज कॉलेजमधील संबंधित विद्यार्थिनींनी हिजाब परिधान करूनच पूर्वतयारीच्या परीक्षेस बघण्याचा आपला हट्ट कायम ठेवल्याने त्यांना परीक्षेस बसण्यास परवानगी नाकारण्यात आली. याच्या निषेधार्थ संबंधित मुस्लिम विद्यार्थिनींनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने केली.
आमच्या धर्माचे रीतीरिवाज -नियम पाळणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम मुली हिजाब आणि बुरखा घालून शिक्षणासाठी कॉलेजला जात आहेत. मात्र नेमकी आत्ताच हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे, अशी तक्रार यावेळी विद्यार्थीनींनी केली.