सदाशिवनगर येथील विजया फार्मा मेडिकल कॉलेजमध्ये हिजाब प्रकरणावरून उठलेला वादंग अद्याप शमला नसून आज शुक्रवारी पुन्हा हिजाब परिधान करून आलेल्या या कॉलेजच्या विद्यार्थिनींनी त्यांना हिजाब घालूनच वर्गात बसण्याची परवानगी दिली जावी, असा अट्टाहास धरला होता.
लिंगराज कॉलेजमधील गेल्या बुधवारची घटना ताजी असताना काल गुरुवारी सदाशिवनगर येथील विजया फार्मा मेडिकल कॉलेजमध्ये हिजाब प्रकरणावरून वादंग उठला होता. कांही युवकांनी कॉलेज आवारात घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग बनले होते.
तथापि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याबरोबरच 6 युवकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा हिजाब परिधान करून कॉलेजला आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींनी आपल्याला वर्गात बसण्याची परवानगी दिली जावी अशी मागणी केली. मात्र त्यांना तसे करण्यास परवानगी नाकारण्यात आली.
हिजाब परिधान करून वर्गात बसण्यास परवानगी नाकारण्यात आल्यामुळे संबंधित विद्यार्थिनींनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कॉलेजचे प्राध्यापक आणि व्यवस्थापन मंडळ तुम्हाला सोमवारपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे असे आम्हाला सांगत आहे. तथापि कॉलेज तर नुकतेच सुरू झाले आहे. इतर विद्यार्थिनींसाठी कॉलेजचे वर्ग सुरू असताना आम्हाला मात्र वर्गात बसू दिले जात नाही.
हा आमच्यावर जाणून-बुजून अन्याय केला जात आहे, असा आरोप संबंधित मुस्लिम विद्यार्थिनींनी केला. या सर्व प्रकारामुळे विजया फार्मा मेडिकल कॉलेज आणि परिसरातील वातावरण पुन्हा तापू लागले होते.
याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कॉलेजला भेट देऊन पाहणी केली. तसेच कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक, पोलीस आणि विद्यार्थिनींशी बातचीत केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मुस्लिम विद्यार्थिनींना समजावण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. आपण कॉलेजमध्ये का येतो याचा विचार त्यांनी करावा. कॉलेजने घालून दिलेल्या नियमांचे त्यांनी पालन केले पाहिजे. हिजाब परिधान करून कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यावर बंदी आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी समजावल्याचे समजते.