बेळगाव लाईव्ह वृत्तसंस्था:- कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब आणि केसरी विवादासंदर्भात कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.. या याचिकेवर न्यायालयाने सुनावणी केली असून हे प्रकरण जोवर शांत होत नाही तोवर कोणत्याही धर्माचे पोशाख शाळा – महाविद्यालयात परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
उडुपी येथील महाविद्यालयात हिजाब वरून सुरु झालेल्या प्रकारानंतर राज्यभरात धार्मिक द्वेष आणि अशांतता पसरली होती. काही हिंदू संघटनांनी यादरम्यान केसरी शेला परिधान करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला आणि पाहता पाहता हे प्रकरण राज्यभरात पेटले. दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर गुरुवारी वरिष्ठ न्यायाधीश रितू राज अवस्थी, न्यायाधीश जे एम काझी आणि न्यायाधीश कृष्णा एस दीक्षित या त्रिसदस्यीय खंडपीठाने सुनावणी केली आहे. या सुनावणीदरम्यान राज्यात सुरु असलेल्या हिजाब आणि केसरी वादावर तात्काळ तोडगा काढण्यात आला आहे.
या प्रकरणासाठी राज्यातील नववी ते दहावी हायस्कुल आणि महाविद्यालयांना तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत पुन्हा शाळा – महाविद्यालये सुरु करण्याचा आदेश देण्यात आला आहे. हा सारा प्रकार शांत होईपर्यंत शांतता राखण्यात यावी, तसेच कोणताही धार्मिक पोशाख परिधान करू नये असे न्यायालयाने सुनावले आहे.
याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त कामत यांनी यावेळी न्यायालयासमोर विनंती केली कि ही सुनावणी संविधानाच्या कलम २५ चे उल्लंघन करणारी आहे. यामुळे घटनेने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होईल, असे देवदत्त कामत म्हणाले.
यावर न्यायाधीश अवस्थी यांनी सदर सुनावणी ही काही कालावधी पूर्ती मर्यादित असल्याचे सांगत न्यायालयाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच या प्रकरणी आणखीन खंडपीठाच्या स्थापनेची आवश्यकता असल्याचेही नमूद केले.