बेळगाव लाईव्ह/विशेष : हिजाबप्रकरणी राज्यभरात लाट उसळली आहे. याचे पडसाद केवळ राज्यातच नाही तर आता देशभरात उमटू लागले आहेत. यामागे काही दुष्ट प्रवृत्ती कार्यरत आहेत, यात तिळमात्र शंका नाही. मात्र या साऱ्या प्रकारात तरुण पिढी नाहक भरडली जात आहे. देशभरात बहुतांशी ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. शिवाय भाजपच्या राजकारणात हिंदुत्व हे आलेच. या हिंदुत्वाच्या नावावर राजकारणी आपली पोळी भाजून घेत आहेत खरे मात्र तरुण पिढी यात वाया जात असल्याचे चित्र दिसत आहे.
हिजाब प्रकरणी बेळगावमध्येही काही अंशी पडसाद उमटले. मात्र सरकारने तीन दिवसांची सुट्टी जाहीर केल्याने हे प्रकरण तूर्तास तरी बेळगावमध्ये शमले आहे. बेळगावमध्ये मराठी – कन्नड हा वाद तर आहेच पण यात आता हिंदू मुस्लिम वाद देखील होण्याची शक्यता सोशल साईटवर वर्तविण्यात येत आहे. सीमाभागातील मराठी तरुणांना कर्नाटक सरकार नेहमीच टार्गेट करत आले आहे. परंतु या प्रकरणी मराठी तरुणांनी शांतता राखावी असे संदेश सोशल साईटवर व्हायरल होत आहेत.
बेळगावमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या विटंबने वरून सुरु झालेल्या आंदोलनात मराठी युवकांवर राजद्रोहासारखा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय अनेक गंभीर आरोपांखाली गुन्हे दाखल करण्यात आले. तब्बल 61 मराठी युवक यात भरडले गेले. काही तरुणांच्या शिक्षणाचेही याप्रकरणी नुकसान झाले. 35 युवकांनी तब्बल 57 दिवस कारागृहात काढले. आता राज्यभरात सुरु झालेल्या हिजाब आणि केसरी वाद बेळगावमध्येही डोकावू लागला आहे. राज्य आणि देशच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील हा विषय गाजत चालल्याचे निदर्शनास येत आहे. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. असे असले तरी काही पक्षांशी बांधील असलेल्याकडून शिमोगा, कुंदापूर येथे हिजाबविरोधात युवक रस्त्यावर उतरत आहेत. बेळगावात कधी उतरणार, असा सवाल मराठीत करून मराठी युवकांना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा समाजविघातक कृतींमध्ये मराठी तरुणांनी सहभागी होऊ नये. याप्रकरणी तटस्थ राहून केवळ सीमाभागातील आपले एकमेव ‘लक्ष्य’ जोपासावे अशी मागणी सुज्ञ मराठी नागरिक करत आहेत.
हिजाब प्रकरणी काही समाजविघातक प्रवृत्तींकडून सोशल साईटवर वातावरण बिघडविण्याचे काम करण्यात येत आहे. परंतु नुकत्याच झालेल्या पुतळा वादातून अनेक मराठी तरुणांनी आपला मार्ग योग्य निवडला असल्याचेही दिसून येत आहे. अनेक सुज्ञ मराठी युवकांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये असे संदेश व्हायरल केले आहेत. भगवा ध्वज आम्ही उभारला तर आम्ही गुन्हेगार! आणि तुम्ही उभारला की हिंदू! हे दुजाभावाचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही अशी भूमिका अनेक मराठी तरुणांनी घेतल्याचे दिसून येत आहे. हिजाब आणि केशरी शेले या प्रकरणी वाद कुठवर जाऊन पोहोचतील याची शाश्वती नाही. परंतु या प्रकरणी राजकारण्यांच्या कोणत्याही कटकारस्थानाला मराठी तरुणांनी बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयावर विश्वास ठेवून न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील राहणे, आणि त्या निर्णयाचे पालन करणे बंधनकारक आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यास सरकार सक्षम आहे. त्यामुळे कोणीही याप्रकरणी आवेगात येऊन चुकीचे पाऊल आणि चुकीचे निर्णय घेऊ नयेत, असेही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी जेमतेम दीड वर्ष शिल्लक राहिले आहे. त्यामुळे समस्त सीमाभागातील तरुणांनी एकवटून केवळ सीमाभागातील मराठी माणसाचे हित ओळखून योग्य ती भूमिका घ्यावी. मराठी युवकांनीही या धार्मिक वादापासून अलिप्त राहावे, धर्माच्या नावावर कोणत्याही बेकायदेशीर प्रकरणांमध्ये न अडकता अशा प्रकारांना खतपाणी घालू नये असे संदेश आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.