हिजाब प्रकरणी सुरु झालेल्या वादानंतर राज्यातील शाळांना सुटी देण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान शाळा सुरु करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आज राज्यातील शाळांना सुरुवात झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी बेळगावमधील सरदार हायस्कुल येथे भेट दिली.
माध्यमिक शाळेला सुरुवात झाल्यानंतर आज सरदार हायस्कुल येथे पुन्हा हिजाब वरून किरकोळ वाद झाला. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील सुनावणीपर्यंत कोणतेही धार्मिक पेहराव परिधान करण्यावर न्यायालयाने निर्बंध घातले आहेत.
यानुसार शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेशद्वारावरच रोखून हिजाब काढण्यासाठी शालेय कर्मचाऱ्यांनी सांगितल्याने पालक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच पोलीस आयुक्तांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली.
या प्रकारानंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले की, न्यायालयाचा अंतरिम आदेश आधीच सर्व शाळांना पाठविला आहे. धार्मिक पेहराव करून अराजकता निर्माण न करता न्यायालयाच्या अंतिम सुनावणीपर्यंत सर्वांनी तटस्थ राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर पोलीस आयुक्त डॉ बोरालिंगया यांनी सांगितले कि, माध्यमिक शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम्ही सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांच्या संपर्कात आहोत. अनुचित घटना घडल्यास कारवाईसाठी आम्ही तयार असून असे प्रकार घडवून आणणाऱ्यांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शाळेच्या बाहेर पोलीस विभागातर्फे सुरक्षा व्यवस्था केली असल्याचे ते म्हणाले.
शाळेच्या आवारात हिजाब घालून परिसरात प्रवेश करु नये असे शाळा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात येत आहे. मात्र बहुतांश मुलींनी हिजाब परिधानकरून आल्याने आज वादावादीचे प्रकार घडला आहे. मंड्यातील रोटरी स्कूलच्या बाहेर पालक आणि शिक्षक यांच्यात हिजाब परिधान केलेल्या मुलीवरुन वाद झाला. सदर विद्यार्थिनींना हिजाब उतरविण्यासाठी शालेय कर्मचाऱ्यांनी विनंती केली परंतु पालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये यावेळी वादावादीचे प्रकार घडले आहेत.