हलगा -मच्छे बायपासच्या कामाला न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा न्यायालयात अपील केले असून याबाबत 50 शेतकऱ्यांना सोमवारी 21 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.
गेल्या 2019 पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हलगा -मच्छे बायपास रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. वर्षभरापूर्वी 2019 मध्ये पोलीस बळाचा वापर करत बायपाससाठी सपाटीकरण करण्यात आले होते. त्यानंतर वडगाव, शहापूर, हलगा, मच्छे आदी भागातील शेतकऱ्यांनी या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने या कामाला स्थगिती देत झिरो पॉइंट निश्चित करण्यासाठी जिल्हा दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्याची सूचना केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी चौथ्या दिवाणी न्यायालयात झिरो पॉइंट निश्चित करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
पुढे शेतकऱ्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने झिरो पॉइंट निश्चित झाल्याशिवाय बायपासचे काम हाती घेऊ नये, अशी स्पष्ट सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला केली होती. मात्र पुन्हा एकदा चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशावर विरोधात प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात अपील केले आहे. त्यानुसार न्यायालयाने 50 शेतकऱ्यांना समन्स बजावत न्यायालयात हजर राहण्याची सूचना केली आहे.
पिरनवाडी ते खानापूर पर्यंतच्या रस्त्याचे काम घेतलेल्या कंत्राटदाराकडे हलगा -मच्छे बायपासचे काम देण्यात आले आहे. सध्या खानापूर पर्यंतच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे बायपासचे काम वेळेत सुरू न झाल्यास ते न करण्याचा निर्णय संबंधित कंत्राटदाराने घेतला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करत आहे.