गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथे आयोजित जीवायके प्रिमियर लीग -2022 या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद यमुनापूर लायन्स या संघाने पटकावले आहे. शिवसेना गौंडवाड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गौंडवाड गावच्या मैदानावर गेल्या महिन्याभरापासून आयोजित करण्यात आलेल्या या साखळी क्रिकेट स्पर्धेत ग्रामीण भागातील मातब्बर 10 संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा अंतिम सामना यमनापुर लायन्स आणि शिवसेना गौंडवाड यांच्यात खेळविला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शिवसेना गौंडवाड संघाने पहिल्या डावात मर्यादित 8 षटकात 5 गडी बाद 61 धावा काढल्या प्रत्युत्तरादाखल यमनापूर लायन्स संघाने मर्यादित 8 षटकात 4 गडी बाद 95 धावा झळकविल्या.
दुसऱ्या डावात शिवसेना गौंडवाड संघाने मर्यादित षटकात 6 गडी बाद 60 धावा काढल्या. परिणामी पहिल्या डावात 34 धावांची आघाडी मिळवणाऱ्या यमनापूर लायन्स संघाने 3 षटकात 1 गडी बाद 27 धावा काढून सामना खिशात टाकताना 9 गडी राखून विजय संपादन केला.
अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी यमनापुर संघाचा विशाल शंभुचे हा ठरला. त्याने 37 धावा काढण्याबरोबरच गोलंदाजीत 4 गडी बाद केले. स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार मनोज पाटील याने पटकाविला. मनोजने संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक 222 धावा काढण्याबरोबरच गोलंदाजीत आठ गडी बाद केले.
अंतिम सामन्यानंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मोहन नाथबुवा, भाऊराव पवार, सुनील देसाई, महादेव पाटील, नीलकंठ पवार, नारायण पिंगट, मारुती निलजकर, अप्पासाहेब मुजावर, बाबू दोडमनी, भैरू संब्रेकर, जोतिबा पाटील, बाबाजान मुजावर, रामा सुलेभाविकार, इम्रान सय्यद, वसीम जमादार, सुरज पाटील, सुभाष शेरवानी, भारत कोलकार, उमेश सांभाजीचे आणि नारायन कणबरकर हे उपस्थित होते. सदर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.