युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या कर्नाटकातील विद्यार्थ्यांची माहिती व काळजी घेण्यासाठी सरकारने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेळगावमध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पालकमंत्री बोलत होते. राज्य सरकारने युक्रेनमधील कर्नाटकच्या विद्यार्थी व नागरिकांची काळजी घेण्यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांमध्ये बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी आणि बेळगावचे प्रांताधिकारी रवी कर्लिंगणार यांचा समावेश आहे.
युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी हे उभय अधिकारी मुंबईला रवाना झाले आहेत, असे कारजोळ यांनी सांगितले.
या पद्धतीने नोडल अधिकार्यांची नियुक्ती झाली असल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विद्यार्थ्यांच्या पालक आणि कुटुंबीयांनी चिंता करण्याची गरज नाही.
युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी सुरक्षित मायदेशी परतावे त्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रयत्नशील आहेत. बरेचशे विद्यार्थी नुकतेच युक्रेन येथून भारतात सुखरूप परत आले आहेत, असे जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ म्हणाले.