दीर्घ कालावधीनंतर बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये आज शुक्रवारी केडीपी बैठक पार पडली. बेळगाव जिल्ह्यातील विविध समस्यांवर गंभीर चर्चा झालेल्या या बैठकीत जिल्हा पालकमंत्र्यांनी अकार्यक्षमतेबद्दल जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना (डीएचओ) चांगलेच धारेवर धरून त्यांची झाडाझडती घेतली.
केडीपी बैठकीमध्ये रामदुर्ग येथे लसीकरणामुळे तीन बालक मृत्युमुखी पडण्याचा जो प्रकार घडला त्यावर चर्चा करण्यात आली. या प्रकरणाचा अहवाल अद्याप का सादर करण्यात आलेला नाही? संबंधित डॉक्टरांवर अजून कारवाई का झालेली नाही? असा सवाल करून जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच बैठकीतूनच पालकमंत्र्यांनी आरोग्य खात्याचे संचालक रणवीर सिंग यांना कॉल लावला.
मंत्र्यांशी बोलताना रणवीर सिंग यांनी बेळगाव जिल्हा हा फार मोठा जिल्हा आहे. येथील जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मुन्याळ हे व्यवस्थित काम करत नाहीत. मागितलेली कोणतीही माहिती ते देत नाहीत असे सांगून डाॅ. मुन्याळ यांचे काम अत्यंत बेजबाबदार असून त्यांची तात्काळ बदली केली जावी आणि बेळगाव सारख्या मोठ्या जिल्ह्यासाठी चांगला क्रियाशील अधिकारी नेमण्यात यावा, असा सल्ला दिला.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या विनाकारण केल्या जाणाऱ्या बदल्या, कोरोना काळात कार्य केलेल्या परिचारिकांना कामावरून कमी करण्याचा प्रकार, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अव्यवस्थित नियोजन आदी उणिवा -तक्रारी निदर्शनास आणून देऊन मंत्री कारजोळ यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मुन्याळ यांची चांगलीच झाडाझडती घेतली.