विमल फौंडेशन पुरस्कृत आणि सौ. प्राजक्ता बेडेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रतिष्ठित पोतदार ज्वेलर्स यांच्या हॉलमार्क प्रमाणित चक्क सोन्याने सजविलेल्या हलव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ आज सकाळी उत्साहात पार पडला
शहरातील अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाडा सभागृहामध्ये हाॅलमार्क प्रमाणित सोन्याने सजवलेल्या हलव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांचे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सोन्याने सजवलेल्या हलव्याच्या दागिन्यांसंदर्भात बेळगाव लाइव्हशी बोलताना सौ. प्राजक्ता बेडेकर म्हणाल्या की, हलव्याचे दागिने मी गेल्या 16 -17 वर्षापासून बनवते. मात्र सोन्यामध्ये हलव्याचे दागिने बनविण्याची कल्पना मला 3 वर्षांपूर्वी सुचली.
मात्र कांही कारणास्तव ती राहून गेलेली कल्पना यंदा मी प्रत्यक्षात उतरवली आहे. यावर्षी मी माझी कल्पना पोतदार ज्वेलर्सचे अनिल पोतदार यांच्यासमोर मांडली. त्यांनी मला सल्ला दिला की तू तुझे हलव्याचे दागिने बनवायचे ते बनवून माझ्यासमोर घेऊन ये, मग ते सोन्यात कसे बसवता येतील ते आपण पाहुया. त्यामुळे सर्वसामान्य लहान बाळांचा हलव्याच्या दागिन्यांचा सेट मी त्यांच्यासमोर मांडला. त्यांना माझी कल्पना खूप आवडली. त्यानंतर दोनच दिवसात त्यांनी हॉलमार्क सोनं माझ्याकडे सोपवलं. चार दिवसात मी दागिने बनवून त्यांच्याकडे घेऊन गेले असता त्यांना ते खूप आवडले. त्यांच्यामते लागलीच त्याचे एक फोटोशूट करून तेथे दुकानातच ते दागिने मांडायचे असे ठरले होते.
मात्र विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांना ही कल्पना जेंव्हा समजली, तेंव्हा ते म्हणाले की, संपूर्ण भारतात हा पहिलाच उपक्रम आहे. बेळगाव सारख्या छोट्या शहरातील एक महिलेने हे केले आहे तेंव्हा ते नक्कीच जगासमोर आले पाहिजे असे सांगितले. त्यानुसार विमल फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचा उद्घाटन सोहळा करण्याचे ठरले. त्यानंतर चेतन नंदगडकर यांच्या सहकार्याने आज जाहीररित्या सोन्याने सजवलेल्या हलव्याच्या दागिन्यांच्या प्रदर्शनाचा हा उद्घाटन सोहळा होत आहे, असे प्राजक्ता बेडेकर यांनी स्पष्ट केले.
बेळगावच्या उद्योजिका प्राजक्ता बेडेकर या तिळगुळाचे दागिने बनविण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे लहान मुलांसाठी किरीट, बासरी, हार, मनगट्या आदी तिळगुळाचे दागिने तयार केले जातात. याशिवाय तिळगुळाचे हार, नेकलेस, गुच्छ, बाजूबंद, मंगळसूत्र, कर्णफुले, कंबरपट्टा, बांगड्या यांचा दागिन्यांच्या सेटमध्ये समावेश असतो. दागिन्यांसाठी लागणारा हलवा प्राजक्ता बेडेकर स्वतः घरीच तयार करतात हे विशेष होय.
बेळगावमध्ये तयार होणाऱ्या हलवा -तिळगुळाच्या दागिन्यांना केवळ भारतात नव्हे तर परदेशातून देखील मागणी आहे. बेडेकर यांनी तयार केलेल्या दागिन्यांना यावर्षी जर्मनीमधील बर्लिन येथूनही मागणी आली आहे. त्याचप्रमाणे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दुबईपर्यंत प्राजक्ता बेडेकर यांच्या तिळगुळाच्या दागिन्यांचा प्रवास सुरू असतो.