गेल्या कांही वर्षापासून इमारत धोकादायक बनली असल्यामुळे गोवावेस येथील बेळगाव महानगरपालिकेच्या मालकीचे प्रशस्त व्यापारी संकुल लवकरच जमीनदोस्त केले जाणार आहे.
गोवावेस येथील महापालिकेचे व्यापारी संकुल आता लवकरच भुईसपाट होणार आहे. त्यासंदर्भात तेथील रहिवासी -वहिवाटदारांना नोटीस बजावण्यात आली असून जागा खाली करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
रहिवाशांनी आपापल्या जागा खाली करून त्या महापालिकेकडे सुपूर्द कराव्यात अशी सूचना करण्यात आली आहे. या व्यापारी संकुलातील बहुतांश दुकानांचा 12 वर्षांचा भाडेकरार 2010 मध्ये झाला होता, त्याची मुदत येत्या 31 मार्च 2022 रोजी समाप्त होणार आहे.
इन्फ्रा स्पोर्ट इंजिनिअरींग कन्सल्टन्सीने गोवावेस व्यापारी संकुल इमारतीचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करून गेल्या 2 नोव्हेंबर रोजी आपला अहवाल महापालिकेकडे सुपूर्द केला आहे गोवावेस व्यापारी संकुलाची इमारत धोकादायक स्थितीत पोचली असल्यामुळे संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान संपूर्ण व्यापारी संकुल पाडण्यात येणार असल्यामुळे तेथील दुकानदारांवर संकट कोसळले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण जुनी इमारत पाडून तेथे नवीन संकुल उभारणार की त्या जागेचा अन्य कारणासाठी वापर केला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोवावेस येथील व्यापारी संकुल उभारण्याचा मुख्य उद्देश महापालिकेला चांगले उत्पन्न मिळावे हा होता.