Wednesday, January 15, 2025

/

दुचाकीच्या भीषण अपघातात 4 मित्र ठार

 belgaum

संकेश्वर येथील राष्ट्रीय महामार्ग जवळ बायपास रस्त्यावर भरधाव दुचाकी पलटी झाल्याने काल गुरुवारी रात्री उशिरा घडलेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर अन्य एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बसवराज अर्जुन माळी (वय 26), प्रवीण कल्लाप्पा सनदी (वय 29), मेहबूब सय्यद शेगडी (वय 21, सर्व रा. आनंदविद्यानगर, संकेश्वर) आणि मलिक फरहान जमादार (वय 21, रा. खंजर गल्ली, बेळगाव) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की बसवराज, प्रवीण, मेहबूब आणि मलिक हे चौघे मित्र दुचाकी क्रमांक (केए 23 एएस 7256) घेऊन गेले होते.

निपाणीकडून शहरातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्यावर पर्वतराव पेट्रोल पंपनजीक या चौघांची भरधाव वेगात असलेली दुचाकी पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात बसवराज माळी, प्रवीण सनदी व मेहबूब शेगडी हे जागीच ठार झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या मलिक जमादार याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच संकेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नागिरी व पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगेनहळ्ळी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी अपघातात ठार झालेल्यांची नावे लवकर समजू शकली नाहीत. चौकशीअंती मृत्युमुखी पडलेले तिघेही मित्र संकेश्वर येथील आनंदविद्यानगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली.

सदर अपघाताची संकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, संकेश्वर येथील तिघांसह चार जीवाभावाच्या मित्रांवर एकाच वेळी अपघाताच्या स्वरूपात काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संकेश्वर नजीकच्या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. परंतु या पद्धतीने प्रथमच अपघातात एकाच वेळी चार मित्र दगावल्याची चर्चा परिसरात होत होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.