बेळगाव शहरात घरोघरी संशयास्पदरित्या भिक्षा मागत फिरणाऱ्या मुस्लिम वेशभूषेतील 5 परप्रांतीय युवकांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना आज बुधवारी घडली.
शहरातील वीरभद्रनगर झिरो क्रॉस येथे मूळचे आंध्र प्रदेश येथील 5 युवक मुस्लिम वेशभूषा करून भिक्षा मागत संशयास्पदरित्या लोकांच्या दारोदारी जाऊन भिक्षा मागत होते.
त्यामुळे परिसरात तर्क-वितर्क लढवून शंका उपस्थित केल्या जात होत्या. अखेर स्थानिक नागरिकांनी त्यांची चौकशी केली असता त्या युवकांनी आपण मूळचे आंध्रप्रदेशचे असल्याचे सांगितले.
तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा मिळावी यासाठी आपण मुस्लिम वेशभूषा परिधान केली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तरीही मनातील संशय कमी न झाल्यामुळे नागरिकांनी त्या पाचही जणांना एका जागी बसवून ठेवले.
तसेच त्यांच्या बाबतची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावनूर यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संबंधित 5 परप्रांतीय युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.