सह्याद्रीनगर येथील क्रिशा केशवानी या विवाहितेने आपल्या दोन मुलांसह अरगण तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून क्रिशाने आपले जीवन संपविल्याची फिर्याद माहेरवासियांनी दिली आहे. त्यामुळे पतीसह 5 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.
क्रिशा मनीष केशवानी या विवाहितेने भावीर आणि विरेन या आपल्या दोन लहानग्या मुलांसह अरगण तलावात उडी टाकून आत्महत्या केली होती. शुक्रवारी सदर घटना घडल्यानंतर काल शनिवारी तीनही मृतदेहांवर सिव्हील हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह आज नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान क्रिशाची आई रिटा कन्हैयालाल अहुजा (रा. स्टेशन रोड, मिरज) यांनी पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली असून भादवि 498 (ए), 360 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खडेबाजारचे एसीपी चंद्रप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत.
पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार क्रिशाचा पती मनीष रामचंद्र केशवानी, सासु नीना रामचंद्र केशवानी, ननंद आरती रामचंद्र केशवानी, पूजा कराडे (सर्व रा. बेळगाव) आणि विकी चट्टानी (रा. उत्तर गोवा) या पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विक्की हा क्रिशाचा भावोजी असून तिच्या सासरच्या मंडळींबरोबर मिळून त्यानेही तिला त्रास केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. मिरजहून आलेल्या क्रिशाच्या माहेरवासीयांनी पतीसह सासरच्या मंडळींनी सुरूवातीलाच क्रिशाचा खून झाल्याचा आरोप केला आहे. क्रिशाने आत्महत्या केली नाही तर तिचा खून करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. सासरच्या जाचाला कंटाळून क्रिशाने आपल्या दोन मुलांचं जीवन संपविले अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
क्रिशाच्या पतीसह सासरच्या मंडळींना अटक करावी अशी मागणी माहेरवासियांनी केली आहे. मात्र मयत क्रिशा हिचा पती मनिष केशवानी हा शुक्रवारी रात्रीपासून फरारी झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला का जाऊ दिले? सुरुवातीलाच त्याला का अटक करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे.