दहावीच्या वार्षिक परीक्षेच्या अंतिम वेळापत्रक जाहीर केल्यानंतर शिक्षण खात्याने आता इयत्ता पाचवी ते नववीच्या शालेय परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 11 एप्रिलपासून शालेय परीक्षांना सुरुवात होणार आहे.
सलग दुसऱ्या वर्षी शाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने शिक्षण खात्याने यावेळी उन्हाळी सुट्टीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी पहिली ते नववीच्या परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
पाचवी ते नववीच्या परीक्षा 11 ते 20 एप्रिलपर्यंत होणार असून पहिली ते चौथीच्या परीक्षेचे वेळापत्रक शालेय स्तरावर ठरविण्यात येणार आहे. सध्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले असून मार्चअखेरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण केला जाणार आहे.
निकाल जाहीर केल्यानंतर उन्हाळी सुट्टी दिली जाणार आहे. प्रथम भाषा विषयाचा लेखी पेपर 100 गुणांचा तर इतर विषयांचे पेपर 80 गुणांचे घेतले जाणार आहेत.
परीक्षेच्या पहिल्या दिवशी 11 एप्रिल रोजी मराठी कन्नड इंग्रजी (प्रथम भाषा), 12 एप्रिल रोजी गणित, 13 एप्रिल रोजी इंग्रजी कन्नड, 16 एप्रिल रोजी क्रीडा -शिक्षण -चित्रकला, 18 एप्रिलला विज्ञान, 19 एप्रिल रोजी कन्नड, इंग्रजी (तृतीय भाषा) आणि 20 एप्रिलला समाज विज्ञान पेपर होईल. परीक्षेला सकाळी 10:30 वाजता सुरुवात होणार आहे.